लॉकडाउन ब्लूज - १

चार भिंतींच्या आत कोंडून घेऊन तुम्ही कधी हा विचार केला आहात की, तुम्ही, जे 'आतआतले तुम्ही' आहात, म्हणजे ज्याला जीएंच्या कथेत 'जीवाचं पाखरू' वगैरे म्हणतात; ते हाडामांसाच्या पिंजऱ्यात कैद आहात?

या शिंच्या लॉकडाउनमध्ये तुम्ही चार भिंतींच्या आत कैद आणि तुमचा जीव तुमच्या आत कैद..

हं! हे म्हणजे एखाद्या प्रोग्रामिंग पझलसारखं झालं.

माणूस हा सोशल अ‍ॅनिमल आहे. मलाही माणसं लागतात. तुम्ही कोण आहात हे कळायला तुमचं 'असणं ' हे इतरांवर शेकूनच यायला लागतं. हे  'इतर 'नसतील तर तुम्ही कोणावर प्रयोग करून पाहणार?..

आणि छताकडे टक लावून हा इतका प्रोफाउंड विचार करत असताना-
आपल्या घराच्या भिंतींचा रंग आपल्याला वाटलेला तसा पीच पिंक नाहीये, तर ती सॅल्मन रंगातली एखादी छटा असावी, मे बी आय शुड लुक इन्टू इट...
असा विचार आलाय का कधी?

एखाद्या बंद खोलीत पाकोळी भिरभिरत राहावी तसे हे विचार डोक्यात भिरभिरत असतात.
पण एनीवे,
मार्चमध्ये पैदा झालेल्या लोकांचा रॅंडम विचार करण्यामध्ये पैला नंबर असतो..त्यामुळे ते डीएनएमध्येच आहे.
हे लॉकडाउनचं कोलॅटरल डॅमेज नाही.

एरव्ही, म्हणजे मार्च २०२० च्या आधी मी फक्त झोपण्यापुरता घरात असायचे. पण मार्च, २०२० नंतर मला हे घर राहण्यायोग्य, घरात बसून काम करण्यायोग्य करावं लागलं. त्यामुळे झाडलोट, जेवणखाण, कपडे-भांडी हे सर्व आपसूकच अंगावर पडलं आणि डोक्याला व्हायचा तो ताप झालाच. मला याची सवय आहे, नाही असं नाही. पण आधी ते बाय चॉइस होतं आणि आता, अजिबात चॉइस नाही.

तर,
मोरियार्टी म्हणतो तसं आपल्या आसपासची धूळ ही आपल्या जून झालेल्या शरीरातून जन्मलेली धूळ असते आणि माझ्या घरात पाहावं तेव्हा धूळ असते. च्यायला इतकी धूळ येते कुठून? त्याला माझ्या घराच्या बाजूला चाललेलं बांधकाम हे लॉजिस्टिकल कारण आहे. आणि, हे तमिळ लोक आयुष्यभर त्यांच्या घराची डागडुजी करत असल्याने मी घर बदलेपर्यंत या धुळीपासून सुटका नाही हे पण आहेच.

पण असलं तरी, मी मोरियार्टीसारखी रोमॅंटिस्ट आहे. क्वारंटाइनचा ठप्पा हातावर मारलेल्या गॉंटलेटधारी थानोसने नंदी हिल्सवर बसून टिचकी वाजवल्याने माझ्या शरीराची अशी हळूहळू, पण नेहमीपेक्षा जास्त धूळ होते आहे असा विचार करायला मला आवडतं. थानोसच्या गॉंटलेटला नंदी हिल्सपासून सी.व्ही. रमन नगरपर्यंत रेंज येत नसेल, वीक सिग्नलमुळे बहुधा.. ती हळूहळू होत असावी बहुधा.
ओके, आवरा.. (माझ्याआतला एक आवाज - ज्याला मी झेल्डा म्हणते)
ओके, मी एकटी आहे इथं. विचार भरकटतात आणि हे असं होतं कधीकधी.. (दॅट्स फाइन! जस्ट डोण्ट ड्वेल ऑन इट - इति झेल्डा)

तर अशा सततच्या धुळीमुळे सकाळ-संध्याकाळ झाडू मारणं, सोफ्यावरून, फर्निचरवरून फडका मारणं ही कामं नित्याचीच आणि पाचवीला पुजलेली. अशाच एका रामप्रहरी सोफा झाडताना मला सोफा कुशन्सच्या खालच्या बाजूने लावलेलं आणि एव्हाना काळं पडलेलं एक मेकूड मिळालं.
येस, मेकूड. बूगर. नाकात असतो तो ऐवज

पहिल्यांदा ते मेकूड आहे हे कळायला मला वेळ लागला. पण नंतर सोफ्याला मस येऊ शकत नाही किंवा सोफ्यावर अशी आपोआप ग्रोथ होऊ शकत नाही, असं माझ्याआतल्या एका आवाजाने (मोनिका) सांगितल्यानंतर मात्र मी विचारात पडले.

कारण मी नाकात बोट घालून त्यातला कोरडा शेंबूड चिवडणाऱ्यातली नाही. त्यामुळे ती प्रॉपर्टी माझी नव्हती.
मग कोणाचं?
मार्चपर्यंत घरी आलेल्यातल्याच कोणाचंतरी. त्या मेकडाचं कार्बन डेटिंग पाहता ते मागच्या मार्चपासून घरी येऊन गेलेल्या कोणाचंतरी.

ज्याचं कोणाचं असेल..पण त्याने इथे सोफ्यावर बसून नाकात बोट घालून इतके प्रताप करेपर्यंत मी कुठे होते, या त्यापाठोपाठ अपरिहार्यपणे आलेला विचार. मग मी डस्टर बाजूला ठेवलं, जमिनीवर मांडी घालून बसले आणि सोफ्याकडे पाहून त्या माणसाची कल्पना करायला लागले आणि माझ्यासमोर तो सीन वेगवेगळ्या माणसांचे चेहरे लेवून उलगडायला लागला.
दिस इझ गोईंग टू बी फन!! (झेल्डा आणि मोनिका यांचं कधी नव्हे ते एकमत)

पहिले म्हणजे..मी स्वत: हे करत नसले, तरी मेकूड काढणे हा एक सोहळा असतो हे मला माहीत आहे. वेगवेगळ्या कोनामधून बोट खुपसून नाकातल्या नाकात हलवाहलवी केल्यावर एकदाचा तो लाभ झालेला असतो.. त्यामुळे त्या माणसाने ते लगेच फेकलं नसणार. ते मेकूड बोटाच्या टोकावर घेऊन निरखून पाहिलं असेल. त्याची मळून मळून गोळी केली असेल, याचं टेक्स्चर आणि रंग मागच्या वेळेपेक्षा जरा वेगळा आहे तो का, मागच्या वेळपेक्षा याचा आकार मोठा आहे का, यावर विचार केला असेल. तो माणूस घरी असता तर त्याने ते टिचकीने उडवून लावायला मागेपुढे पाहिलं नसतं..पण इथे किमान दुसऱ्याच्या घरी आहोत म्हणून इथे चिपकवून दिलं असेल.. (माझी मावसबहिण त्याची टिकली करून तिच्या भावलीच्या कपाळावर चिकटवायची, आईकडे सगळ्या लाल टिकल्या आहेत अशी तक्रार करत).

पण..आपण असं का गृहित धरतो आहे की, त्याने/तिने असं एकच मेकूड काढलं असेल?
दोन काढली असतील. एक चिकटवलं असेल आणि दुसरं टिचकीने भिरकावलं असेल. या एका आसुरी विचाराने माझ्या रिकाम्या मनात असंख्य शक्यतांना जागा तयार झाली आणि माझ्या घरातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात अशी मेकडं पडून आहेत या विचाराने माझा (आणि मोनिकाचा) जीव घाबराघुबरा झाला.
या असल्या ट्रेझरहंटसाठी माझी मानसिक तयारी बिलकुलच नव्हती.
पण त्याने झालं असं की..
त्याची चिंता करण्यात एक तास बरा गेला आणि घर जरा नेहमीपेक्षा जास्त स्वच्छ झालं.
आणि त्यानंतर,
आपण एक तास मेकडाचा विचार करत होतो याची नोंद करताना "मला वेड लागलं आहे का फायनली?" प्रश्न पुन्हा एकदा (rhetorically) विचारला गेला.

यू आर जस्ट फाइन!! (-झेल्डा)

--

तुम्ही असं बेफिकीरीने उडवून लावलेलं मेकूड तुम्हाला कधी पुन्हा सापडलं आहे का, कचऱ्यात आलं आहे का? "हैला, हे उडून इथे पडलं होतं होय?" असा विचार करायची संधी तुम्हाला मिळाली आहे का? त्या मेकडाचं नंतर काय होतं? कधी कचऱ्यात आलंच तर ते मेकूडच आहे, दगड किंवा जुना, धुळमटून काळा पडलेला उडदाचा दाणा नाही, हे तुम्हाला कसं कळतं? मेकडाचं 'नवेपण' कसं ओळखतात? बसच्या सीटच्या खाली मेकूड लावणाऱ्या लोकांना दुसऱ्यांची मेकडं लागलेल्या सीटा मिळतात तेव्हा त्याला "कर्मा पेबॅक" असं म्हणतात का?

तुमची मेकडं तुमच्या बॉयफ्रेंडच्या/गर्लफ्रेंडच्या खुर्चीच्या खाली, बेडच्या कोपऱ्यावर चिकटलेली असतील, तर हाउ द फक यू मूव्ह ऑन..? ब्रेकअपनंतर तो तुमच्या आणि तुम्ही त्याच्या गोष्टी “मला तुझी एकही गोष्ट घरात नको” असं करवादत एकमेकांच्या घरी नेऊन आपटता, त्यावेळी याचा विचार कोणी केलेला असतो का?
अशी दोन-तीन मेकडं या-त्या कोपऱ्यात पडून आहेत
वो भिजवा दो
मेरा वो सामान लौटा दो

अशी साद कोणी कोणाला घातली असेल का?

मेकडाचा वापर करून कोणी करणी, चेटूक, व्हूडू वगैरे करू शकतं का? असं असेल तर त्या व्हूडू बाहुल्याला मी विक्सचा वाफारा देऊ शकेन..

एनीवे,
तर तुमच्यापैकी काही लोकांना मी मागच्या दोन महिन्यामध्ये ती घरी आला होतास/होतीस तेव्हा सर्दी झाली होती का? अशी विचारणा करणारा रॅंडम कॉल केला असेल तर..
तो यासाठी होता.

No comments:

 
Designed by Lena