अकाली मोठेपण आलेली 'लिटील डॉटर'

लिटील डॉटरमेमॉयर ऑफ सर्व्हायव्हल इन बर्मा अॅंड वेस्ट’ 
झोया फन, डेमियन लुई
SIMON & SCHUSTER
पृष्ठसंख्या - ३३५

-

जगाचा इतिहास हा अनेक क्रुर, रक्तलांछित घटनांनी भरलेला आहे. एखाद्या वंशाचे समूळ उच्चाटन करणे, दार्फुर जेनोसाईड्स, भारत-पाक फाळणी, बोस्निया-हर्जेगोविनामधला वांशिक हिंसाचार इत्यादी. अशा घट्ना केवळ हातावर मोजण्याइतक्या आहेत असंही नाही, तर अगणित आहेत. आणि त्या अशा आहेत म्हणूनच ’रोज मरे त्याला कोण रडेया न्यायाने चार दिवस हळहळणे, कट्ट्यावर, ग्रुपमध्ये चर्चा रंगवणे याखेरीज त्यांना महत्व सामान्य माणसाकडून दिले जात नाही. अशा घटनांमागे मग अमुक ठमुक दशकातील काळा दिवस/काळ’ असा टॅग लागतो, किंवा त्याचा पॉलिटीकल सायन्सकिंवा जागतिक इतिहासाच्या सिलॅबसमधला वीसेक मार्काचा प्रश्न बनतो. आपल्याला तसं ऑब्जेक्टीव्हली बघायची सवयच लागलेली असते, काय करणार, इलाज नसतो! पण तेच आणि तसंच जेव्हा आपल्या जीवावर बेततं, आपल्या मुळावर उठतं तेव्हा ते तितकसं ऑब्जेक्टीव्ह उरत नाही, तसं उरायला नको असं वाटतं आणि मग त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरु होतात. कोपऱ्यावरच्या बंटीला विचारलं, तर त्याला म्यानमार आणि बर्मा हे दोन वेगवेगळे देश आहेत हे वाटण्याचीच शक्यता जिथे जास्त, तिथे तिथल्या करेनलोकांचा स्वातंत्र्यासाठी चाललेल्या लढ्याचं काय? पण कोपऱ्यावरच्या बंटीला माहीत नसलं, तरी असे लढा नेटाने लढला जातोय हे सत्य बदलत नाही, की त्यापायी एका दिवसात तिथल्या लाखो लोकांचं जग इकडचं तिकडे होतंय हे सत्यही. सुमारे चार दशके स्वातंत्र्यासाठी चाललेल्या बर्माच्या लोकांची अशीच एक प्रातिनिधिक कहाणी त्या लढ्याचा एक भाग असलेल्या झोया फनच्या शब्दात वाचायला मिळते, तिच्या लिटील डॉटर: मेमॉयर ऑफ सर्व्हायव्हल इन बर्मा अॅंड वेस्टया पुस्तकात! ते वाचताना आपण त्यांच्या जागी असतो, तर आपलं  काय झालं असतं याचा विचार करायला मग तेवढ्या कल्पनाशक्तीची गरज लागत नाहीमा सा ऱ्या

झोया फन ही बर्मातील लोकशाहीकरता चालललेल्या लढ्यातील सक्रीय कार्यकर्ती आहे. ’सफर सायलेंटलीचं बिरुद लागलेले काही लढे असे असतात, ज्याची कुठेही वाच्यता होत नाही, त्यात कोण-किती-कसे मारले गेले याची कानोकान खबर कोणाला लागत नाही. लढणारे लढत राहतात, लढताना मरत राहतातपण, आजच्या सक्रीय राजकारणाच्या आणि आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीच्या काळात आंतरराष्ट्रीय दबावतंत्र आणि सामूहिक बंदी अशा कृतींचा अवलंब करुन एखाद्या राष्ट्राला अन्यायकारक गोष्टी करत राहण्यापासून अटकाव करता येतो, आणि नेमकं हेच झोयाला कळलं. वास्तविक पाहता, नेमकं हेच जगापर्यंत पोहोचू नये याकरता बर्मामधून कोणी जिवंत बाहेर पडूच नये याची चोख तजवीज बर्माच्या हुकूमशाहीने केलेली; पण, झोया निसटली. तिने दशकानुदशके चालललेल्या या लढ्याला, त्यातील अनेकांचे हौतात्म्य यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचा फोडली आणि बर्माच्या लोकशाहीच्या लढ्याला एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिलं. 'आंग  सान स्यू की'च्या गैरहजेरीत कोणीतरी हे करण्याची गरज होती आणि ते काम झोयाने चोख पार पाडलं.

'लिटील डॉटर' हे प्रथमपुरुषी एकवचनी निवेदन करेनलोकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या, बर्मामध्ये मुजोर हुकूमशाहीने चालवलेल्या दडपशाहीचा आणि जुलूम-जबरदस्तीचा लेखाजोखा आहे. यातील 'लिटील डॉटर' म्हणजे खुद्द झोया आहे. झोयाचे वडील बर्माच्या स्वातंत्रलढ्यातील धडाडीचं व्यक्तिमत्व ,तर आईनेही लग्नापूर्वी सैन्यात काम केलेलं. आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून सुरुवात करुन आपल्या गावाचं, बहीण-भावंडांचं-त्यांच्यातल्या जिव्हाळ्याचं , सवंगडयांचं, करेन लोकांच्या दंतकथा, सणवार, विधीश्रद्धास्थानं, चालीरितींचं वर्णन करत ती आपल्याही नकळत आपल्याला म्वेक्लो नदीच्या काठावर वसलेल्या त्या पेर्हेलू गावात घेऊन जाते. अतिप्रिय असलेल्या खेळण्यांच्या खोलीत खूप दिवसांनी पाय टाकावा आणि हरखून हरखून जावं, तसं हे लिहीताना देशापासून कित्येक वर्षं दूर राहावं लागलेल्या झोयाचं झालंय. झाडं, फ़ुलं, पानं, नद्यांवर प्रेम करणारी ही साधीसुधी माणसं, आयुष्याकडून यांच्या अपेक्षा कितीशा असतात? पण, निरागस, निष्पाप, भोळ्या-भाबड्यांचे बळी युद्धात सर्वप्रथम घेतले जातात हे इतिहासाने वारंवार सिद्ध केलेलं आहेच, या कहाणीतही काही वेगळं घडत नाही. युद्धाची झळ न लागलेली पहिली दहा वर्षं, त्यानंतर घोंघावू लागलेलं युद्धाचं सावट, युद्धाबरोबर अपरिहार्यपणे येणाऱ्या मृत्यू, हत्या या दाहक सत्याचा अनुभव घेताना सुखी , आनंदी, खेळकर, आयुष्याचं कवच एकाएकी खळ्ळकन फुटल्याचं आपल्याला जाणवतं. पण प्रत्येक निवेदनातून ती किती धीराची आहे हेच कळून येतं. जबरदस्त इच्छाशक्तीचं बाळकडू, तो वसाच तिला आईवडीलांकडून गुणसूत्रांतूनच मिळाला असावा. बर्मन डिक्टेटरशिपच्या तर्हेवाईकपणाचे, जुलूम-जबरदस्तीचे, बायका-मुलींवरच्या पाशवी बलात्कारांचे किस्से सांगताना ती कडवट जरुर होते, पण ते वर्णन कुठेही अंगावर येत नाही. कोणाचा कैवार न घेता, कोणाच्याही बाजूचं जास्त स्पष्टीकरण न देता, जे आहे तसंच मांडायचा झोयाचा प्रयत्न दिसतो.

झोयाच्या जडण-घडणीत तिच्या आई-बाबांचं मोठं योगदान आहे. मॉर्टर बॉम्बचे आवाज, शत्रूच्या विमानांची घरघर, भकाभका निघणारा धूर बघून तिथं काय चाल्लंय तरी काय? या झोयाच्या प्रश्नाला ते पलीकडच्या गावात फटाके उडवतायेत बाळा" असं वेळ मारुन नेणारं खोटं खोटं उत्तर देत नाहीत. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीची ढोबळ कल्पना तिला त्याच वेळी यायला लागते. एके ठिकाणी स्थिरस्थावर होतो न होतो, तोच उंतही न देता राहत्या जागेवरून हुसकावून लावणारं बर्मी सैन्य तिला सरतेशेवटी थायलंड-बर्माच्या सीमेवर आसरा घ्यायला लावतं. थायलंडमध्ये जाचक बंधनात, निर्बंधात राहताना जगत राहणं, चालत राहणं हाच एक धर्म होऊन बसतो. स्वप्न डोळ्यासमोर उध्वस्त होताना बघितलेली, भविष्याची खात्री नाही, आप्तांची ख्यालीखुशाली कळत नाही, ते सुखरुप हातीपायी धड परततील याची खात्री नाही, आज आहे तर उद्या असूच याची शाश्वती नाही अशा परिस्थितीतून सुटायचं कसं हा मार्ग शोधताना झोयानो अजूनही अाशेचा हात सोडलेला नाही हे कळतं. असं असतानाही थायलंडमधलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरचं ऐषोआरामाचं आयुष्य आणि पुढचं उभं आयुष्य आपल्या बाबांसारखं बर्माच्या लोकशाहीच्या लढ्याकरता, करेन लोकांकरता वेचणं हे दोन पर्याय समोर उभे ठाकलेले असताना ती नि:संदीग्धपणे दुसरया पर्यायाची निवड करते तेव्हा स्तिमित व्हायला होतं.

असं का होतंय? आपल्याबरोबरच का? हे प्रत्येक पापभीरु माणसाला, शोषित, पीडीत माणसाला पडणारे प्रश्न. हे आणि आपल्याच मायभूमीत निर्वासितासारखं जगण्याची वेळ का यावी? असे अनेक प्रश्न झोयाला पडतात, कालांतराने तिने त्याची उत्तरंही मिळवलेली दिसतात. घेरुन आलेली भीती, दडपण यातून तगून राहण्याची या माणसांची ताकद पाहिली की दिपून जायला होतं. प्रत्येक हल्ल्यात अजि म्या काळ पाहिलाची प्रचिती, औषधाअभावी जिवाभावाच्या मैत्रिणीचा झालेला मृत्यू, त्याने ढवळून निघालेलं तिचं भावविश्व, मृतांमध्ये आपलं नातेवाईक नाहीयेत पाहुन वाटल्यावर होणारा आनंद, त्यानंतर लगेचच आप्पलपोट्यासारखं वाटून येणारी अपराधीपणाची भावना, याचं वर्णन केवळ निरलस वृत्तीने लिहीलेलं आहे. त्यात कोणताही आव नाही. खूप लहानपणी लंडनला जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या झोयाला शेवटी तिथेच शिकायला मिळतं. कदाचित नियतीच्या मनात तेच असावं; कारण ब्रिटनमध्येच बर्मा कॅंपेनची धडाक्यात सुरुवात होते.तिथूनच झोयाला 'बीबीसी'वरच्या कार्यक्रमात बोलायची संधी मिळते आणि बघता बघता झोया बर्माच्या लढ्याचा आंतरराष्ट्रीय आवाज होऊन बसते. नुसती हळहळ कामाची नाही, तर काहीतरी ठोस कृती करणे आवश्यक आहे हे कळल्याने झोया जाहीर सभांमध्ये बोलून यू.एन आणि इतर मानवतावादी संघटनांवर दबाव आणायचं काम करते. या सर्वांमध्ये बर्मा सरकारचा रोष ओढवून घेतल्याने तिच्यावर आणि तिच्या बाबांवर मारेकरी घातले जातात, पण ती केवळ नशिबाने बचावते. पण अशाच एका हल्लात तिचे बाबा मात्र वाचत नाहीत.

रेफ्युजीपणाचे सल, शरीर एका ठिकाणी तर मन तिथे मायदेशात अशी ओढगस्त अवस्था आपण अनेक कथांमधून वाचून अनुभवलेली आहे. आपल्याला मायदेशातून हुसकावून लावलेल्यांबद्दल मनात कधीही न भरून येणारा कडवटपणा असेल तर त्यात आश्चर्य काहीच नाही. पण, वैयक्तिक कडवटपणा आणि सामूहिक कडवटपणा यात फरक आहे. ही कडवटपणाची भावना सार्वत्रिक व्हावी यााठी झोया निदर्शने करते आहे, सभांमध्ये पोटतिडीकीने बोलते आहे. निराधार, आपत्दग्रस्त लोकांचा तारणहार असलेल्या यू. एन. बद्दल मात्र झोया तक्रार करते. यू.एन बर्मामध्ये वेगवेगळे पुनर्वसनाचे कार्यक्रम राबवते आहे, बर्माच्या करेन लोकांना वेगवेगळ्या देशात नेऊन सोडते आहे, पण मूळ प्रश्नाला बगल देऊनच. लाखो लोकांच्या स्वप्नांची धुळवड दररोज खेळणाऱ्या, त्यांचे आयुष्य दुरापास्त करुन टाकणाऱ्या बर्माच्या हुकूमशाहीची मनमानी, लोशाहीची आवश्यकता ह्या मूळ प्रश्नालाच यू. एन. हात घालताना दिसत नाही. तिला दुसऱ्या कोणत्याही परक्या देशात नाही, तर आपल्या मायदेशातच परत जायचंय आणि त्यासाठी तिला जगभरातून जे कोणी मदत करु इच्छितात त्यांची मदत हवी आहे. झोयाला मायदेशी परतायचंय, आणि त्यासाठीच तिचा व इतर अनेकांचा लढा चालू आहे.

स्वातंत्र्य कोणी कोणाला बहाल करत नसतं, ते आपलं आपणच मिळवायचं असतं. त्यासाठी अनेक लढे लढले गेलेलढणारे मरतील कदाचित, मारलेही जातील; पण त्यांची स्वप्नं कधीही मरत नाहीत. एखाद्या व्यक्तीचा ज्यावर नितांत विश्वास आहे ती मूल्यं त्या व्यक्तीच्या मरणानंतर नाहीशी होत नाहीत, काळाच्या पडद्याआड जात नाहीत. ती मूल्यं जिवंत आहेत, त्यांच्यावर गाढ विश्वास आहे म्हणूनच झोया, तिचं कुटुंबिय, तिच्यासारखे अनेक करेन नागरीक जीवाची पर्वा न करता लढत आहेत. का? तर बर्माला स्वतंत्र झालेला पाहणं हे त्यांचं स्वप्नं आहे म्हणून, आणि त्याआधी अनेकांचंही तेच स्वप्नं होतं म्हणून. आपली कैफियत जगापर्यंत पोहोचवल्यावाय आणि मदतीचा हातभार लागल्यावाय हे स्वप्नं प्रत्यक्षात येणं शक्य नाही हे कळल्यानेच झोयाने या पुस्तकाचा डाव मांडल्यासारखा वाटतो.


--

अनुवाद:
ब्रह्मकन्या
झोया फन, डेमियन ल्युई
अनुवाद: श्रद्धा भोवड
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस

1 comments:

Varsha Vipra said...

आपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.