![]() |
कोबे, जपान ला बसलेल्या ७.३ रिश्टर स्केलच्या महाप्रचंड भूकंपानंतर उध्वस्त झालेल्या घरातलं किचन. फोटो सौजन्य: केनेथ हॅम/अलामी |
--
ती पाच दिवस टीव्हीसमोरुन हलली नव्हती. कोसळलेल्या बँका, जमीनदोस्त झालेली हॉस्पिटलं, दुकानांना लागलेली आग, उलून गेलेल्या रेल लाईन, उध्वस्त झालेले एक्प्रेसवे हे सगळं एकटक पाहात तिने स्वतःला सोफ्यावरील उश्यांमध्ये गाडून घेतलं होतं आणि ओठ घट्ट मिटून घेतले होते. कोमुरा तिच्याशी काही बोलायचा तेव्हा ती उत्तरही द्यायची नाही. किमान तो बोलतोय ते समजतंय हे सांगण्याकरता ना डोकं हलवायची ना मान डोलावायची. आपण बोलतोय ती तिच्यापर्यंत पोहोचतंय तरी का, हे ही कोमुराला कळत नव्हतं.
आणि रविवारी, म्हणजे हे सगळं सुरु झाल्याच्या सहाव्या दिवशी तो कामावरुन घरी आला तेव्हा त्याची बायको घरातून निघून गेली होती.
कोमुराची बायको मूळची यामागाताची आणि त्याच्या माहितीप्रमाणे कोबेमध्ये तिची कोणी मैत्रिण किंवा नातेवाईकही राहात नव्हतं. पण तरीही तिने सकाळपासून रात्रीपर्यंत स्वतःला टीव्हीशी खिळवून घेतलं होतं. कोमुरा उठला की स्वतःच स्वतःचा टोस्ट-कॉफी बनवून घ्यायचा आणि कामाला निघून जायचा. संध्याकाळी घरी परतला की तो फ्रिजमध्ये जे काही असेल त्याने खाणं बनवून घ्यायचा आणि एकट्यानेच खायचा. तो झोपायला जातेवेळीही ती रात्रीच्या बातम्यांवर डोळे खिळवून असायची. तो घरात असताना तरी तिने काहीही खाल्लं नव्हतं किंवा काहीही प्यायलं नव्हतं. ती टॉयलेटलाही गेली नव्हती. तिच्या सभोवताली एक भण्ण शांततेची भिंत उभी राहिल्यासारखी होती. कोमुरा त्या भिंतीला थडकण्याचे प्रयत्न करुन थकला आणि नंतर केव्हातरी त्याने ते प्रयत्न सोडून दिले.
कोमुरा अकिहाबारा इलेक्ट्रॉनिक्स टाऊनमध्ये सेल्समन म्हणून काम करायचा. ते टोकियोतलं ऑडियो उपकरणांचं सर्वात जुनं स्टोअर होतं! तो तिथे हाय-एण्ड उपकरणं विकायच्या कामावर होता. सेल केला की त्याला भलंभक्कम कमिशनही मिळायचं. त्याचे बहुतेक सर्व क्लायण्ट डॉक्टर, श्रीमंत व्यावसायिक अशा मालदार पार्टी होत्या. तो हे काम गेली आठ वर्षं करत होता आणि त्याने या कामातून बरीच माया मिळवली होती. त्यावेळी जपानची अर्थव्यवस्था भक्कम होती, रिअल इस्टेटच्या किंमती फुगत होत्या आणि पैसा अक्षरश: ऊतू चालला होता. लोकांची दहा-दहा हजारांच्या येन्सनी भरलेली लठ्ठ पाकिटं मोकळी व्हायला आतुर होती. मग काय तर! सर्वात महागडी वस्तू सर्वात पहिली विकली जाण्याचा जमाना होता तो!
कोमुरा अकिहाबारा इलेक्ट्रॉनिक्स टाऊनमध्ये सेल्समन म्हणून काम करायचा. ते टोकियोतलं ऑडियो उपकरणांचं सर्वात जुनं स्टोअर होतं! तो तिथे हाय-एण्ड उपकरणं विकायच्या कामावर होता. सेल केला की त्याला भलंभक्कम कमिशनही मिळायचं. त्याचे बहुतेक सर्व क्लायण्ट डॉक्टर, श्रीमंत व्यावसायिक अशा मालदार पार्टी होत्या. तो हे काम गेली आठ वर्षं करत होता आणि त्याने या कामातून बरीच माया मिळवली होती. त्यावेळी जपानची अर्थव्यवस्था भक्कम होती, रिअल इस्टेटच्या किंमती फुगत होत्या आणि पैसा अक्षरश: ऊतू चालला होता. लोकांची दहा-दहा हजारांच्या येन्सनी भरलेली लठ्ठ पाकिटं मोकळी व्हायला आतुर होती. मग काय तर! सर्वात महागडी वस्तू सर्वात पहिली विकली जाण्याचा जमाना होता तो!
उंचपुरा, सडसडीत अंगकाठीचा कोमुरा अत्यंत स्टायलिश ड्रेसर होता! त्याला लोकांशी वागायची कला अवगत होती. त्याने लग्नापूर्वी अनेक स्त्रियांना डेट केलं होतं. पण, सव्विसाव्या वर्षी लग्न केल्यानंतर मात्र त्याची त्या प्रकरणांमधली इच्छा अचानकच संपून गेली होती. त्यांच्या लग्नाला पाच वर्षं उलटून गेली होती आणि त्या पाच वर्षांमध्ये कोमुरा आपली बायको सोडून दुस-या कुठल्याही बाईसोबत झोपला नव्हता. संधी चालून आल्या होत्या, नाही असं नाही, पण या उडत्या प्रकरणांमधला, वन-नाईट-स्टँडमधला त्याचा रस पूर्णपणे संपला होता. लवकर घरी येऊन बायकोसोबत गप्पा मारत आरामात जेवण घेणं, सोफ्यावर बसून तिच्याशी गप्पा मारणं आणि मग पलंगात तिच्यावर अजून प्रेमाचा वर्षाव करणं त्याला आवडे. त्याला हेच हवं होतं, बाकी काहीही नाही!
कोमुराचे मित्र मात्र त्याच्या या लग्नाने बुचकळ्यात पडले होते. कोमुराचे देखण्यात मोडणारे लुक्स पाहाता त्याची बायको खूपच साधारण होती. बुटकी, जाडजूड, मांसल दंड असणारी. तिचा एकंदर अवतारच मठ्ठ होता. बरं, दिसण्याकडे दुर्लक्ष करायचं म्हटलं तर तिचं व्यक्तिमत्वही फारसं आकर्षक नव्हतं. ती फार कमी बोलायची आणि तिच्या चेह-यावर बहुतेक वेळा त्रासिकच भाव असायचे.
असं असलं तरीही कोमुरा त्याच्या बायकोसोबत असायचा तेव्हा त्याला आपल्यावरचा सगळा ताण निघून जातो आहे असं वाटायचं. असं का? याचं कारण त्याला सांगता यायचं नाही, पण, तो तिच्यासोबत असतानाच ख-या अर्थाने रिलॅक्स होऊ शकायचा. ती बाजूला असताना त्याला चांगली झोप लागायची. लग्न होण्याआधी भयानक स्वप्नांनी त्याची झोप चाळवायची, पण लग्नानंतर त्याला शांत झोप लागायला लागली. त्याला उत्तम इरेक्शन यायचं आणि त्यांचा सेक्सही ब-यापैकी होता. आता त्याला पूर्वीप्रमाणे मृत्यूची, एखादा गुप्तरोग होण्याची किंवा विश्वाच्या प्रचंड, महाकाय असण्याची भीती वाटत नव्हती.
त्याच्या बायकोला मात्र टोकियोचा, टोकियोतल्या गर्दीचा आणि शहरी वातावरणाचा प्रचंड तिटकारा होता. तिला यामागाताची खूप आठवण यायची. तिला तिच्या आई-वडिलांची, तिच्या दोन मोठ्या बहिणींची अगदी खूप आठवण आली की त्यांना भेटायला यामागाताच्या घरी निघून यायची. तिचे आई-वडिल एक हॉटेल चालवायचे आणि ते चांगलं चालायचं, त्यामुळे तिच्या घरी पैशाला ददात नव्हती. शिवाय, तिच्या बाबांचं त्यांच्या धाकट्या मुलीवर खूपच प्रेम होतं, त्यामुळे तिच्या येण्या-जाण्याचा खर्चही तेच करायचे. अनेकदा कोमुरा कामावरुन घरी यायचा तेव्हा त्याची बायको यामागाताला गेलेली असायची आणि आपण काही दिवसांकरिता आई-वडिलांकडे जात आहोत अशा आशयाची एक चिठ्ठी किचनच्या टेबलवर त्याची वाट पाहात असायची. त्याने याला कधी हरकत घेतली नाही. तो तिच्या परतण्याची वाट पाहायचा आाणि तीही एक आठवडाभराने, दहा दिवसांनी छान मूडमध्ये परतायची.
पण भूकंपानंतर पाच दिवसांनी त्याच्या बायकोने त्याच्यासाठी मागे सोडलेल्या पत्रातला मजकूर मात्र वेगळा होता. तिने लिहिलं होतं, "मी कधीही परत येणार नाही." आणि मग तिने आपल्याला कोमुरासोबत राहायची इच्छा का नाही हे स्पष्ट केलं होतं. तिने म्हटलं होतं, "प्रॉब्लेम हा आहे की, तू मला कधीच, काहीच देत नाहीस, किंवा आपण असं म्हणूयात की तू मला देऊ शकशील असं तुझ्याआत काहीच नाहिये. तू चांगला आहेस, तुझा स्वभाव चांगला आहेस आणि तू देखणाही आहेस, पण तुझ्यासोबत राहाणं म्हणजे एखाद्या हवेच्या तुकड्यासोबत राहाण्यासारखं आहे. यात तुझी चूक नाही. अनेक बायका तुझ्या प्रेमात पडतीलह, पण प्लीज, मला कॉल करु नकोस. माझ्या ज्या वस्तू मी ठेवून गेले आहे त्या टाकून दे."
तिने विशेष काही असं मागे सोडलेलं नव्हतं. तिचे कपडे, तिचे शूज, तिची छत्री, तिचा कॉफी मग, तिचा हेअर ड्रायरः सगळं तिने आपल्यासोबत नेलं होतं. तिने ते सगळं बॉक्समध्ये भरुन तो कामावर निघून गेल्यानंतर यामागाताला पाठवून दिलं असलं पाहिजे. घरात तिच्या म्हणण्याजोग्या अशा फारच कमी गोष्टी उरल्या होत्या.ती खरेदीकरता जाताना वापरायची ती सायकल आणि काही पुस्तकं, बस्स! कोमुरा लग्नाच्या आधीपासून जमवत होता त्या बीटल्स आणि बिल इव्हान्सच्या सीडीही ती आपल्यासोबत घेऊन गेली होती.
दुस-या दिवशी त्याने आपल्या बायकोच्या यामागाताच्या घरी कॉल केला. त्याच्या सासूने फोन उचलला आणि त्याच्या बायकोला त्याच्याशी बोलायची इच्छा नाही असं सागींतलं. सासूचा स्वर त्याला थोडासा अपराधी वाटला. त्याची बायको त्याला लवकरच घटस्फोटाचे कागद पाठवेल, त्याने त्यावर सही करुन ते लगेच परत पाठवून द्यावेत असाही निरोप तिने कोमुराला पोहोचता केला.
यावर कोमुराने आपल्याला ते कागद लगेच परत पाठवता येणार नाहीत असं सांगीतलं. ही गोष्ट त्याच्याकरता महत्त्वाची होती आणि त्याला त्यावर विचार करण्याकरिता वेळ हवा होता.
"तू विचार करायला कितीही वेळ घेऊ शकतोस, पण त्याने काही बदलेल असं वाटून घेऊ नकोस." त्याची सासू म्हणाली.
तिच्या बोलण्यातही तथ्य होतं. तो कितीही वेळ थांबला असता तरीही गोष्टी पूर्वी होत्या तशा झाल्या नसत्या. आणि, त्याला याची खात्री होती.
--
![]() |
कोबेपासून चौदा मैलावर असलेल्या निशिमोयामधला ब्रिज. १७ जानेवारी, १९९५ला कोबेला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर. (फोटो सौजन्य: सेनकाई आर्काईव/गेट्टी) |
घटस्फोटाचे कागद सही करुन पाठवून दिल्यानंतर काही दिवसांमध्येच त्याने कामावरुन सुट्टी घेतली. फेब्रुवारी महिन्यामध्ये तसाही धंदा व्हायचाच नाही, शिवाय आपल्या आयुष्यात काय चाललंय हे त्याने त्याच्या बॉसला सांगीतलेलं होतं, त्यामुळे त्याला सुट्टी मिळताना अडचण आली नाही.
कोमुराचा ससाकी नावाचा सहकारी होता, तो जेवणाच्या वेळेत कोमुरापाशी आला आणि म्हणाला, "मी ऐकलं की तू सुट्टी घेतोयेस म्हणून. काही विचार केला आहेस का? काय करायचं, कुठं जायचं म्हणून?"
"नाही केला." कोमुरा म्हणाला, "काय करु मी?"
ससाकी अविवाहित होता आणि कोमुरापेक्षा वयाने पाच वर्षं लहान. नाजूक चणीचा, आखूड केसांचा ससाकी गोल, सोन्याच्या काड्यांचा चष्मा घालायचा. तो खूप म्हणजे खूपच बडबड करायचा, शिवाय त्याच्या प्रत्येक कृतीतून अतिआत्मविश्वास झळकत असायचा आणि ते ब-याच लोकांना आवडायचं नाही. पण कोमुराला त्याने काही फरक पडायचा नाही त्यामुळे त्या दोघांचं चांगलं जमायचं.
"काय करायचं अजून ठरवलेलं नाहीस? बरं, मग आता सुट्टी घेतोच आहेस तर कुठेतरी जाऊन का येत नाहीस?"
"कल्पना वाईट नाही", कोमुरा म्हणाला
आपला चष्मा हातरुमालाने पुसत ससाकीने कोमुरावर एक शोधक नजर टाकली
"होक्कायडोला गेला आहेस का कधी?" त्याने विचारलं
"नाही, कधीच नाही." कोमुरा म्हणाला,
"जायला आवडेल?"
"का बरं विचारतोस?"
ससाकीने उगीचच घसा साफ केला आणि डोळे बारीक करुन कोमुराकडे पाहात म्हटलं, "तुला खरं सांगू का, मला कुशिरोला एक छोटं पॅकेज पाठवायचं आहे आणि तू ते माझ्या वतीने घेऊन गेला असतास तर बरं, असं वाटतंय. अर्थात तू हे काम मला फेव्हर म्हणून करतोयेस, त्यामुळे मी तिकीटाचा खर्चही आनंदाने करेन. इतकंच काय, कुशिरोमधल्या हॉटेलचा खर्चही माझ्यावर सोड."
"छोटं पॅकेज?"
"इतकंसं असेल", ससाकीने आपल्या हाताने चार इंच लांबीचा चौकोन दाखवत म्हटलं, "फार जड नाही."
"कामाचं आहे का काही?"
ससाकीने मान हलवली, "नाही, मुळीच नाही. पूर्णपणे खाजगी. मला ते इथे-तिथे जायला नकोय, म्हणून मी ते मेलने पाठवत नाहिये. शक्य असेल तर ते पॅकेज तू प्रत्यक्ष हातीच दिलंस तर बरं. खरंतर हे काम मीच करायला हवं होतं, पण माझ्याकडे होक्कायडोला जाण्या-येण्याइतका वेळ नाहीये."
"खूप महत्त्वाचं आहे का?"
त्याने ओठ मुडपून मान हलवली, "ते फार नाजूकही नाहिये आणि त्यात कुठलं धोकादायक सामानही नाहिये. चिंता करायची गरज नाही. एअरपोर्टवर एक्स-रे करतानाही तुला कोणी थांबवणार नाही. मी तुला कुठल्याही लफड्यात टाकत नाहिये, शप्पथ. मी ते मेलने पाठवत नाहीये कारण मला ते मेल करावंसं वाटलं नाही इतकंच."
फेब्रुवारीमध्ये होक्कायडोमध्ये गोठवणारी थंडी असेल हे कोमुराला माहित होतं, पण थंडी काय किंवा गरमी काय, त्याला तसाही कुठे काय फरक पडत होता?
"मी ते पॅकेज कोणाला द्यायचं आहे?"
"माझ्या बहिणीला. माझी लहान बहिण. ती तिथेच राहाते."
कोमुराने ससाकीची ऑफर स्वीकारायची ठरवली. त्यावर जास्त विचार करण्यासारखं काही नव्हतंच. ते काम टाळायचं तर त्याच्याकडे काही भक्कम कारण नव्हतं शिवाय, त्याच्याकडे तसंही काही करण्यासारखं नव्हतंच. ससाकीने ताबडतोब एअरलाईनला कॉल लावला आणि दोन दिवसांनंतरचं तिकीट बुक केलं.
दुस-या दिवशी कामावर आल्यावर ससाकीने कोमुराच्या हाती तो, मेलेल्या माणसांची राख ठेवण्याकरिता असतो तसा एक बॉक्स दिला. हा फक्त थोडासा लहान होता, मॅनिला पेपरमध्ये गुंडाळलेला होता. तो लाकडाचा असावा असं वाटतं होतं आणि वजन तर काहीच नव्हतं. त्या पॅकेजभोवती गुंडाळलेल्या पेपरवर पारदर्शक टेपच्या पट्या गुंडाळलेल्या होत्या. कोमुराने तो हातात घेतला आणि काही सेकंद त्याचं निरीक्षण केलं. त्याने तो थोडासा हलवून पाहिला, पण त्याला आत काही हलल्यासारखं वाटलं नाही.
"माझी बहिण तुला एअरपोर्टवरुन पिकअप करेल." ससाकी म्हणाला, "तीच तुझी रुम बुक करणार आहे. तू फक्त गेटवर जाऊन तिला भेटायचं आहेस."
--
कोमुरा कुशिरोला जाण्याकरता घरातून बाहेर पडला तेव्हा तो बॉक्स त्याच्या सूटकेसमध्यल्या जाड शर्टामध्ये गुंडाळलेला होता. प्लेनमध्ये त्याला वाटली होती त्याहून कितीतरी जास्त गर्दी होती. हिवाळ्याच्या मध्यावर ही इतकी सारी लोकं टोकियोहून कुशिरोला का चालली असावीत? त्याला प्रश्न पडला.
सकाळचा पेपर भूकंपाच्या बातम्यांनी भरलेला होता. प्लेनमध्ये बसल्या बसल्या त्याने तो अथपासून इतिपर्यंत वाचून काढला. मृतांचा आकडा वाढत होता. काही भागांमध्ये अजूनही पाणी आणि वीज नव्हतई, कितीतरी लोक बेघर झाले होते. प्रत्येक लेखामध्ये एकतरी ट्रॅजेडी होतीच, पण कोमुराला त्या ट्रॅजेडी भिडल्या नाहीत. त्या ट्रॅजेडी त्याला आवाजाचा एकसुरी प्रतिध्वनी असावा त्याप्रमाणे वाटल्या. विमान जसजसं पुढे चाललंय तसतशी आपली बायको आपल्यापासून क्षणाक्षणाने दूर चाललिये हाच एक विचार त्याला त्या क्षणी गंभीरपणे विचार करण्यासारखा वाटला.
जेव्हा त्याला बायकोबद्दल विचार करुन आणि छोट्या टायपातल्या बातम्या वाचून थकवा आला तेव्हा त्याने डोळे मिटून घेतले आणि एक झोप काढली. तो जागा झाला तेव्हा त्याच्या डोक्यात पुन्हा एकदा बायकोचा विचार आला. ती काही न खाता-पिता, सकाळपासून रात्रीपर्यंत या भूकंपाच्या बातम्या का पाहात होती? तिला असं काय दिसलं जे त्याला दिसलं नाही?
एअरपोर्टवर दोन सारख्या सारख्या डिझाईनचे ओव्हरकोट घातलेल्या दोन तरुण स्त्रिया कोमुरापाशी आल्या. त्यातली एक गोरी, बहुदा पाच फूट सहा इंच उंच आणि आखूड केसांची होती. तिच्या नाकापासून ते वरच्या ओठांमधला भाग जरा जास्तच मोठा होता. तिला पाहून कोमुराला खूर असलेले आखूड केसांचे प्राणीच आठवले एकदम! दुसरी स्त्री पाच फूट एक असेल. ती नकटी नसती तर छान दिसली असती. तिचे लांब केस थेट खांद्यापर्यंत आले होते आणि तिने ते कानांमागे घेतले होते. तिच्या उजव्या कानाच्या पाळीवरचे दोन तीळ कोमुराला बरोब्बर दिसले, तिने घातलेल्या इअरींग्जनी तर ते जास्तच ठळक दिसत होते. त्या दोन्ही स्त्रिया साधारण विशी-पंचविशीच्या होत्या. त्यांनी कोमुराला एअरपोर्टच्या कॅफेमध्ये नेलं.
"माझं नाव किको ससाकी", त्यातली ती उंच मुलगी म्हणाली. "तुम्ही किती मदत केलीत हे माझ्या भावाने मला सांगीतलं, ही माझी मैत्रीण शिमाओ"
"नाईस टू मीट यू", कोमुरा म्हणाला
"हाय", शिमाओ म्हणाली.
"तुमची बायको नुकताच वारली असं माझ्या भावाने सांगीतलं", किको ससाकीने थोड्याशा हळुवार आवाजात म्हटलं.
कोमुरा एक क्षण थांबला आणि म्हणाला, "नाही, ती वारली नाही."
"मी परवाच माझ्या भावाशी बोलले. तुमची बायको गेली असंच म्हणाला तो, मला अगदी स्पष्ट आठवतंय."
"हो, ते गेली हे खरंय. पण ती मला सोडून गेली आणि माझ्या माहितीप्रमाणे ती जिवंत आहे व सुखात आहे."
"विचित्रच आहे. इतका महत्त्वाचा तपशील मी चुकीचा ऐकला असण्याची शक्यताच नव्हती." तिने त्याच्याकडे उगीचच एक दुखरा कटाक्ष टाकला. कोमुराने त्याच्या कॉफीत थोडीशी साखर टाकली आणि घोट घेण्याआधी कॉफी थोडीशी ढवळली. कॉफी अगदी पातळ होती, अगदी बेचव! मी इथे काय करतो आहे? त्याला न राहावून प्रश्न पडला.
"असो, मीच चुकीचं ऐकलं असेल. त्याशिवाय अशी चूक होणं शक्य नाही." किको ससाकी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्यासारखी बोलली. तिने एक खोल श्वास घेतला आणि खालचा ओठ मुडपला.
"माफ करा, मी उगाचच वाद घातला."
"हरकत नाही. आणि तसंही, आता ती निघून गेली आहे."
कोमुरा आणि किको बोलत असताना शिमाओ काहीच म्हणाली नाही, पण त्या वेळात ती हस-या चेह-याने कोमुरावर डोळे लावून बसली होती. तिला तो आवडला होता वाटतं. तो तिच्या हावभावांवरुन आणि तिच्या बॉडी लँग्वेजवरुनच सांगू शकत होता. तिघांमध्ये काही क्षण शांतता पसरली.
"असो, तर मी ज्यासाठी आलोय ते काम करुयात". कोमुरा म्हणाला. त्याने त्याची सूटकेस उघडली आणि जाड शर्टामध्ये गुंडाळलेला बॉक्स बाहेर काढला.
किकोने टेबलावरुन हात लांबवून तो बॉक्स घेतला. तिचे भावविरहित डोळे त्या पॅकेजवर खिळले होते. तिने त्याचं वजन आजमावल्यानंतर कोमुराने केली तशीच गोष्ट केली, तो बॉक्स कानाजवळ नेऊन हलवून पाहिला. मग ती कोमुराकडे पाहून हसली, याचा अर्थ सगळं काही व्यवस्थित आहे हे त्याला कळलं. तिने तो बॉक्स आपल्या भल्यामोठ्या शोल्डर बॅगमध्ये ठेवून दिला.
"मला एक कॉल करायचा आहे." ती म्हणाली, "थोडाच वेळ लागेल, चालेल का?"
"हो हो", कोमुरा म्हणाला, "अवश्य."
किकोने आपली ती शोल्डर बॅग खांद्यावर लटकावली आणि थोड्याशा अंतरावर दिसण-या फोन बूथच्या दिशेने चालायला लागली. कोमुरा तिचं निरीक्षण करत होता. तिच्या शरीराचा वरचा भाग स्थिर होता, पण कंबरेच्या खालचा भाग लयबद्ध पण किंचित यांत्रिक हालचालींनी झोके खात होता. कोमुराला वाटलं की आपण हा क्षण असाच्या असा मागे केव्हातरी अनुभवला आहे, पण शिमाओच्या प्रश्नाने तो ताडकन वर्तमानात आला.
"तुम्ही यापूर्वी होक्कायडोला आला होतात कधी?" शिमाओने विचारलं
कोमुराने मान हलवली
"मी समजू शकते. खूप लांबचा पल्ला आहे."
कोमुराने पुन्हा मान हलवली. त्याने आपल्या आजूबाजूला नजर टाकली. "जरा विचित्र आहे खरं", तो म्हणाला,
"पण इथे बसल्यावर आपण इतक्या दूर आलो आहोत असं वाटतच नाहिये."
"तुम्ही विमानाने आलात ना म्हणून. ही विमानं काहीच्या काही फास्ट असतात. तुमचं मन शरीराच्या वेगाशी जुळवून घेऊ शकत नाही."
"तुमचं म्हणणं बरोबर असावं."
"तुम्हाला इतका लांब प्रवास करायची खरंच इच्छा होती?"
"हो, होती खरी", कोमुरा म्हणाला
"तुमची बायको तुम्हाला सोडून गेली म्हणून?"
कोमुराने मान हलवली
"तुम्ही किती लांबवर प्रवास करा, तुम्ही स्वतःपासून दूर जाऊ शकत नाही", शिमाओ म्हणाली
शिमाओ बोलत असताना कोमुरा टेबलावरच्या सारखेच्या वाटीकडे नजर लावून बसला होत, पण मग त्याने वर शिमाओकडे पाहून म्हटलं,
"हो, खरंय", तो म्हणाला, "तुम्ही किती लांबवर प्रवास करा, तुम्ही स्वतःपासून दूर जाऊ शकत नाही. हे म्हणजे सावलीसारखं आहे. ती तुम्ही जाल तिथे तुमच्या मागावर असते."
शिमाओने कोमुराकडे लक्षपूर्वक पाहिलं, "तुमचं तिच्यावर खूप प्रेम होतं, हो ना?"
कोमुराने प्रश्नाला बगल दिली आणि विचारलं, "तुम्ही किको ससाकींच्या मैत्रीण आहात का?"
"हो. आम्ही ब-याच गोष्टी एकत्र करतो."
"कोणत्या गोष्टी?"
त्याला उत्तर देण्याऐवजी शिमाओने विचारलं, "तुम्हाला भूक लागली आहे?"
"माहित नाही", कोमुरा म्हणाला, "भूक लागल्यासारखंही वाटतंय, नाही लागल्यासारखंही वाटतंय."
"आपण असं करुयात, कुठेतरी जाऊन काहीतरी गरमागरम खाऊयात. काहीतरी गरम खाल्लंत म्हणजे तुम्हाला बरं वाटेल."
-
शिमाओने तिची इटुकली फोर व्हीलर सुबारु काढली. किको शिमाओच्या बाजूला बसली आणि मागच्या सीटवर कोमुरा कोंबल्यासारखा बसला. शिमाओचं ड्रायव्हींग वाईट होतं असं नव्हे, पण त्या डबड्याच्या मागच्या बाजूला प्रचंड खडखडाट चाललेला होता. त्या कारचं सस्पेंशन पुरतं उडालेलं होतं. त्या कारने लाख किमीचा टप्पा कधीच पार केलाय हे सहज लक्षात येत होतं. ऑटोमॅटिक ट्रान्शमिशन चालू करायला गेलं तर गिअर पडायचा, हिटर आळीपाळीने थंड-गरम होत राहायचा. कोमुराने डोळे मिटून घेतले तर त्याला सतत आपल्याला एका वॉशिंग मशिनमध्ये कोंडून घातलंय असा भास होत होता.
कुशिरोच्या रस्त्यांवर बर्फ जमा होऊ देत नसत, त्यामुळे दर दोन मिनीटांनी जमा करुन रस्त्याच्या बाजूला उभ्या करुन ठेवलेल्या मातकट बर्फाचे ढीगच्या ढीग दिसत होते. ढग दाटून आले होते, सूर्यास्त अद्याप झालेला नसला तरी सर्वत्र अंधारं, उदासवाणं वातावरण होतं. वारा तर त्या शहरातू सूं सूं करत सैरावैरा पळत होता. रस्त्यावर एकही पादचारी दिसत नव्हता. इतकंच काय तर ट्रॅफिक लाईट्स पण गोठून स्तब्ध झाले होते.
"होक्कायडोमधला हाच एक भाग असाय की जिथे जास्त बर्फ पडत नाही", किकोने कोमुराकडे पाहात मोठ्यांदा म्हटलं, "आपण आता समुद्राच्या जवळ आहोत आणि वारा जोरात आहे. त्यामुळे इथे जे काही बर्फ जमा करुन ठेवतात ते सगळा वा-याने उडून जातो. इथे प्रचंड थंडी असते, अक्षरशः गोठवणारी थंडी. कधीकधी वाटतं की इतक्या थंडीने आपले कान झडून जातील की काय."
"रस्त्यावर झिंगून पडलेले दारुडे थंडीने मेलेले पण ऐकलंय मी", शिमाओ म्हणाली,
"इथे बिअर मिळते का?" कोमुराने विचारलं.
किको अचानक खुदखुदली आणि तिने शिमाओकडे वळून म्हटलं, "शिमाओ, बिअर!"
शिमाओने पण त्याला खदखदून हसत साथ दिली.
"मला होक्कायडोबद्दल जास्त काही माहित नाही म्हणून विचारलं", कोमुराने वरमून म्हटलं
"मला बिअरबद्दल एक झकास गोष्ट माहित आहे", किको म्हणाली, "हो की नाही शिमाओ?"
"एकदम भन्नाट!" शिमाओ म्हणाली
मग ते संभाषण तितक्यावरच थांबलं. त्या दोघींपैकी कोणीही त्याला ती बिअरबद्दलची भन्नाट गोष्ट सांगीतली नाही आणि तोही आपणाहून विचारायला गेला नाही. लवकरच ते खाण्याच्या जागेवर पोहोचले. हायवेवरचं एक मोठं नूडल शॉप बघून त्यांनी गाडी लावली आणि आत गेले.
कोमुराने बीअर आणि रामेन नूडल्स घेतल्या. ती जागा गलिच्छ होती, तिथे एकही गि-हाईक नव्हतं, खुर्च्या आणि टेबलांचा नुसता पसारा पडलेला होता, पण रामेन मस्त होतं. कोमुराचं रामेन खाऊन संपलं तशी त्याला खरंच बरं वाटलं.
"तर, मि. कोमुरा", किको म्हणाली, "तुम्हाला होक्कायडोमध्ये काही बघायचं आहे आहे का? काही करायचं आहे का? माझा भाऊ सांगत होता की तुम्ही इथे एक आठवडा आहात म्हणून."
कोमुराने एक क्षण विचार केला, पण आपल्याला करावीशी वाटणारी एकही गोष्ट त्याच्या डोक्यात येईना
"सरळ गरम बाथ घ्यायचा का? मला माहितीये एक जागा, इथून फार लांब नाहिये."
"काही वाईट कल्पना नाही", कोमुरा म्हणाला.
"तुम्हाला आवडेल, खूप छान जागा आहे, बिअर नाही, काही नाही."
त्या दोघी पुन्हा एकमेकींकडे बघून खिदळल्या.
"मी तुम्हाला तुमच्या बायकोबद्दल काही विचारलं तर तुम्हाला राग नाही ना येणार?" किकोने विचारलं
"नाही, नाही येणार"
"ती कधी निघून गेली?"
"अं? भूकंपानंतर पाच दिवसांनी. म्हणजे आजपासून दोन आठवड्यांपूर्वी, मला वाटतं त्याहून जास्तच दिवस झाले असावेत."
"भूकंपाचा आणि तिच्या निघून जाण्याचा काही संबंध होता का?"
कोमुराने मान हलवली, "नाही, नसावा. म्हणजे, मला तसं नाही वाटत."
"अशा गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असतीलही, कोणी सांगावं, नाही का?" शिमाओने मान कलती करुन म्हटलं.
"हो ना", किको म्हणाली, "फक्त त्या कशा जोडल्या गेल्यात हे आपल्याला सांगता येत नसतं."
"बरोबर", शिमाओ म्हणाली, "अशा प्रकारच्या गोष्टी ब-याचदा घडतात"
"कशा प्रकारच्या गोष्टी?" कोमुराने विचारलं
"म्हणजे, माझ्या ओळखीतला एकजण आहे, त्याच्यासोबत असं काहीतरी घडलं होतं"
"तू मि. सेकींबद्दल बोलतेयेस का?" शिमाओने विचारलं
"हो", किको म्हणाली, "एक माणूस आहे, सेकी नावाचा, कुशिरोमध्ये राहातो. चाळीसेक वर्षाचा असेल. तो हेयर स्टायलिस्ट आहे. त्याच्या बायकोला गेल्या वर्षी यू.एफ.ओ. दिसली. ती एके रात्री शहराच्या बाहेरुन एकट्याने गाडी चालवत चाललेली असताना तिने ती प्रचंड मोठी यूएफओ एका शेतात जाऊन आदळलेली पाहिली, वूsssश्श करत. ’क्लोझ एन्काऊंटर’मध्ये दाखवलंय ना, तसंच. एका आठवड्यानंतर ती घर सोडून निघून गेली. नुसती गेली नाही तर नाहिशी झाली. ती पुन्हा कधीच परत आली नाही. त्यांच्यामध्ये काही वाद, भांडणं होती अशातलाही भाग नव्हता."
"आणि हे सगळं त्या यू.एफ.ओ.मुळे झालं?" कोमुराने विचारलं.
"ते का झालं हे मला माहित नाही. ती एके दिवशी उठली आणि निघून गेली. चिठ्ठी ठेवली नाही की काही ठेवलं नाही. तिला शाळेत शिकणारी दोन मुलं आहेत, पण ती त्यांनाही सोडून गेली. तिच्याबद्दल अजून काहीही कळलेलं नाहीये." किको म्हणाली, "घरातून निघून जाण्याच्या आधी एक आठवडा ती फक्त यू.एफ.ओ.बद्दल बोलत होती. जो भेटेल त्याला यू.एफ.ओ.बद्दल सांगत होती, तिला थांबवणं मुश्कील झालं होतं. ती एकदम सुरुच व्हायची आणि ती यू.एफ.ओ. किती मोठी आणि सुंदर होती हे सांगत बसायची."
किको ती गोष्ट इतरांच्या गळी उतरेपर्यंत थांबली.
"माझ्या बायकोने मला चिठ्ठी लिहून ठेवली होती", कोमुरा म्हणाला, "आणि आम्हाला मुलंही नाहीत."
"तर मग तुमची अवस्था मि. सेकीहून खूपच चांगली म्हणायची", किको म्हणाली
"हो ना, मुलांनी खूप फरक पडतो", शिमाओने दुजोरा भरला
"शिमाओचे वडिल ती सात वर्षांची असताना घर सोडून गेले" किकोने अचानक म्हटलं, "बायकोच्या लहान बहिणीसोबत पळून गेले."
त्या तिघांमध्ये एक शांतता पसरली.
मग कोमुरानेच विषय बदलण्याकरता म्हटलं, "कदाचित असंही असू शकेल की मि. सेकींची बायको घर सोडून निघून गेली नसेल, कदाचित तिला त्या यूएफओमधल्या एलियन्सनी किडनॅप केलं असेल."
"हो, शक्यंय". शिमाओचा चेहरा थोडा विषण्ण होता, "अशा कितीतरी गोष्टी ऐकायला मिळतात"
"म्हणजे तुला म्हणायचंय की तू रस्त्याने चालत असताना अचानक एक बिअर येऊन तुला खाऊन टाकतं तशी गोष्ट?" किकोने विचारलं. आणि त्या दोघी पुन्हा खिंकाळल्या.
मग ते तिघं नूडल शॉपमधून निघाले आणि जवळच्याच एका लव्ह हॉटेलमध्ये गेले. शहराच्या बाहेरच होतं ते. त्या भागात आळीपाळीने ग्रेव्हस्टोन विकणा-यांची दुकानं आणि लव्ह हॉटेल्स असा विचित्र प्रकार होता. शिमाओने निवडलेलं हॉटेल म्हणजे एक युरोपियन महालाच्या धर्तीवर बांधलेली एक विचित्र इमारत होती तिच्या सर्वात उंच टॉवरवर एक लाल झेंडा लहरत होता.
किकोने फ्रण्ट डेस्कवरुन चावी घेतली आणि ते सगळे एलेव्हेटरने रुममध्ये आले. त्या रुमला एकदम लहान खिडक्या होत्या, त्यामानाने तिथला पलंग भलामोठा वाटत होता. किमुराने जॅकेट काढून हँगरला लावलं आणि तो टॉयलेटला गेला. तो बाहेर येईपर्यंतच्या काही मिनिटांमध्ये त्या दोघींनी बाथमधलं पाणी सुरु केलं, लाईट्स डिम केले, हीटर वाढवला, टीव्ही लावून ठेवला, जवळपासच्या रेस्टॉरण्ट्समध्ये काय काय आहे हे मेन्यूंमधून पाहिलं, पलंगाच्या डोक्याशी असलेल्या स्विचशी खेळ केला आणि मिनिबारमध्ये काय काय आहे ते पाहिलं.
"या जागेचे मालक माझे दोस्त आहेत", किको म्हणाली, "मी त्यांना एक मोठी रुम तयार करुन ठेवायला सांगीतली होती. हे लव्ह हॉटेल आहे खरं, पण त्याने विचित्र वाटून घेऊ नकोस. तुला विचित्र वाटत नाहिये ना?"
"नाही, मुळीच नाही", कोमुरा म्हणाला
"स्टेशनच्या बाजूच्या एखाद्या प्रचंड महाग खुराड्यामध्ये तुला ठेवण्यापेक्षा इथे आणणं खूपच बरं असं वाटलं."
"बरंच केलंस", कोमुरा म्हणाला
"तू बाथ घेणार आहेस ना? मी टब भरुन ठेवलाय."
कोमुराने तिने सांगीतल्याबरहुकूम सगळं केलं. तो टब खूप म्हणजे खूपच मोठा होता. त्यात एकटाच पडून बाथ घेताना त्याला खूप विचित्र वाटत होतं. इथे येणारी कपल्स बहुदा एकत्रच बाथ घेत असावीत.
तो बाथरुममधून बाहेर आला तेव्हा किको ससाकी निघून गेली होती. त्याला आश्चर्य वाटलं. पण, शिमाओ अजूनही तिथे होती. बीअर पीत टीव्ही पाहात होती.
"किको घरी गेली", शिमाओ म्हणाली, "तिने तुला ती उद्या सकाळी परत येईल असा निरोप द्यायला सांगीतलाय आणि सॉरीही म्हटलंय. मी थोडावेळ इथे थांबले आणि बीअर प्यायले तर तुझी काही हरकत नाही ना?"
"नाही", कोमुरा म्हणाला
"नक्की काही हरकत नाही ना, म्हणजे तुला एकटं राहायचं असेल किंवा कोणी आजूबाजूला असाताना तुला रिलॅक्स होता येत नाही असं तर काही नाही ना?"
त्याची खरंच काहीच हरकत नाही असं कोमुराने पुन्हा एकदा सांगीतलं. त्याने बीअर पीत पीत टॉवेलने केस वाळवले, शिमाओसोबत टीव्ही पाहिला. टीव्हीवर कोबेच्या भूकंपावरचा खास भाग सुरु होता. तीच तीच चित्रं पुन्हा पुन्हा येत राहिलीः कललेल्या इमारती, उखडलेले रस्ते, अश्रू गाळणा-या म्हाता-या स्त्रिया, गोंधळाचं वातावरण, नक्की कोणावर येतोय हे न समजणारा संताप. जाहिरात लागली तशी शिमाओने रिमोट घेऊन टीव्ही बंद केला.
"आपण बोलूयात का जरा", ती म्हणाली, "आपण इथे आहोत तोवर."
"चालेल", कोमुरा म्हणाला
"कशावर बोलायचं?"
"आपण कारमध्ये होतो तेव्हा तू आणि किको बिअरबद्दल काहीतरी म्हणालात, आठवतंय? तू म्हणालीस ती एक भन्नाट गोष्ट आहे"
"ओह, ती होय", ती मान डोलावत म्हणाली, "बिअर म्हणजे अस्वलाची गोष्ट"
"अच्छा, मला सांगणार का ती गोष्ट?"
"हो, का नाही?"
शिमाओने रेफ्रोजिरेटरमधून फ्रेश बीअर आणली आणि दोघांचेही ग्लास भरले.
"थोडीशी ’तसली’ आहे, ती म्हणाली, तुझी हरकत नाही ना?"
"नाही", कोमुराने मान हलवली, "काहीच हरकत नाही"
"नाही, म्हणजे मला असं विचारायचं होतं की काही पुरुषांना बायकांनी अशा गोष्टी सांगीतलेल्या आवडत नाहीत, तुझं तस काही नाही नां?"
"नाही, माझं तसं काही नाही."
"ती गोष्ट माझ्याबाबतीतच घडलिये, त्यामुळे थोडं विचित्र देखील वाटतंय"
"तुला चालत असेल तर मला ऐकायला आवडेल"
"मला चालेल", शिमाओ म्हणाली, "जर तुला चालणार असेल तर.."
"मला चालणार आहे", कोमुरा म्हणाला
"ऐक मग. तीन वर्षांपूर्वी, म्हणजे माझं कॉलेज नुकताच सुरु झालं होतं तेव्हाची गोष्ट आहे. मी एका मुलाला डेट करत होते. तो माझ्याहून एका वर्षाने मोठा होता. मी ज्याच्यासोबत पहिला सेक्स केला तोच हा मुलगा. एके दिवशी आम्ही वरच्या बाजूच्या डोंगरांमध्ये हायकींगला गेलो होतो." शिमाओने बीअरचा सिप घेतला. "मला वाटतं तेव्हा पानगळीचा मोसम होता आणि त्या डोंगरांमध्ये अस्वलांचा सुळसुळाट झाला होता. वर्षातला हा काळ म्हणजे अस्वलांचा खाउन सुस्तावण्याचा काळ असतो, त्यामुळे ते अन्नाच्या शोधात असतात आणि अतिशय धोकादायक बनतात. कधीकदी ते लोकांवरही हल्ला करतात. आम्ही हायकींगला गेलो त्याच्या तीन दिवस आधी त्यांनी एका हायकरला फाडून छिन्नविच्छिन्न केलेलं. त्यामुळे कोणीतरी आम्हाला सोबत घंटी न्यायला सांगीतली. आम्ही ती चालताना वाजवत जायचं होतं, जेणेकरुन आसपास माणसं आहे हे अस्वलांना कळेल. अस्वलं काही स्वतःहून माणसांवर हल्ला करत नाहीत. ते खरंतर शाकाहारी प्राणी आहेत, त्यामुळे त्यांना माणसांवर हल्ला करायचं खरं तर काहीच कारण नाही, पण, त्यांच्याच प्रदेशामध्ये त्यांच्यासमोर अचानक एखादा माणूस उगवतो, तेव्हा ती गडबडतात किंवा भडकतात, आणि प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून त्याच्यावर हल्ला करतात. त्यामुळे आम्ही चालताना घंटी वाजवत राहायची होती, अस्वलांना टाळण्याकरिता, समजलं?"
"हो, समजलं."
"तर, आम्ही तेच केलं, आम्ही घंटी वाजवत चाललो होतो. चालत चालत आम्ही एके ठिकाणी आलो जिथे आमच्याशिवाय कोणीच नव्हतं. आणि अचानक त्याला.. ते करावंसं वाटलं. मलाही ती कल्पना आवडली, त्यामुळे मी म्हटलं ओके. मग आम्ही कोणाला दिसू नयेत म्हणून एका गर्द झुडूपाच्या मागे गेलो, जमिनीवर मोठं प्लॅस्टिक अंथरलं. पण मला अस्वलांची भीती वाटत होती. म्हणजे तूच विचार कर ना, की तुम्ही सेक्स करताना तुमच्या अस्वलाने पाठून हल्ला केला आणि तुम्हाला मारुन टाकलं तर काहीतरीच, नाही का? मला तसं मरायचं नव्हतं, तुला काय वाटतं?"
आपल्यालाही तसं मरण आलेलं आवडणार नाही याला कोमुराने पुष्टी दिली
"तर ते तिथे आम्ही तसे, एका हाताने घंटी वाजवणारे आणि सेक्स करणारे. आम्हाला ती घंटी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाजवत राहायला लागली. टिंग-अ-लिंग! टिंग-अ-लिंग!"
"तुमच्यापैकी कोणी घंटी वाजवली?"
"आम्ही आळीपाळीने घंटी वाजवत राहिलो. माझा हात थकला की मी त्याच्याकडे द्यायचे आणि त्याचा हात थकला की तो माझ्याकडे. ते तसं सेक्स करताना पूर्णवेळ घंटी वाजवत राहाणं इतकं विचित्र होतं की काय सांगू! मला आजही सेक्स करताना ते आठवलं की फस्सकन हसूच येतं."
कोमुराला हसायला आलं.
शिमाओ लहान मुलीसारखी टाळी वाजवत म्हणाली, "ओ, किती छान, तुला हसता येतंय तर.."
"अर्थातच", कोमुरा म्हणाला, पण खरंच, आपण इतक्यात हसलेलोच नाही हे त्याच्या लक्षात आलं. आपण शेवटचं कधी हसलो?
"मी पण बाथ घेतला तर तुझी हरकत नाही ना?" शिमाओने विचारलं
"नाही", कोमुरा म्हणाला
ती आंघोळ करेपर्यंत कोमुरोने एका कर्कश्य आवाजाच्या कॉमेडियनचा व्हरायटी शो पाहिला. त्याला तो शो पाहाताना किंचीतही हसू आलं नाही, पण हा शोचा दोष मानावा की स्वतःचा हे त्याला सांगता येईना. तो बीअर प्यायला आणि मिनीबारमधून दाण्यांचं एक पॅकेट फोडलं. शिमाओ बराच वेळ बाथमध्ये होती. शेवटी ती बाहेर आली तेव्हा तिच्या अंगावर टॉवेलशिवाय दुसरं काहीही नव्हतं. ती पलंगाच्या कडेला बसली. तिने अंगावरचा टॉवेल खाली टाकला आणि मांजरीसारखी चादरीत शिरुन कोमुराकडे पाहू लागली.
"तू तुझ्या बायकोसोबत शेवटचा केव्हा झोपलास?" तिने विचारलं
"मला वाटतं, डिसेंबर संपताना"
"आणि त्यानंतर काहीच नाही?"
"नाही, काहीच नाही."
"कोणासोबतही नाही?"
"नाही, कोणासोबतही नाही"
कोमुराने डोळे मिटून मान हलवली.
"मला काय वाटतंय सांगू?" शिमाओ म्हणाली, "तू जरा सैल कर स्वतःला आणि थोडसं लाईफ एन्जॉय करायला शिक. म्हणजे बघ नाः उद्या भूकंप होऊ शकेल, तुला एलियन्स किडनॅप करु शकतील, एखादं अस्वल तुला खाऊन टाकू शकेल. उद्या काय होणारे हे कोणालाच माहित नसतं."
"खरंय, उद्या काय होणारे हे कोणालाच माहित नसतं", कोमुराने दुजोरा दिला
"म्हणूच डिंग अ लिंग!", शिमाओने म्हटलं.
शिमाओसोबत सेक्स करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर कोमुराने तो नाद सोडला. त्याच्यासोबत याआधी असं कधीच झालं नव्हतं.
"तू तुझ्या बायकोबद्दल विचार करत असशील, म्हणून असं होत असेल", शिमाओने म्हटलं.
"हो", कोमुरा म्हणाला, पण प्रत्यक्षात तो भूकंपाबद्दल विचार करत होता. एखाद्या स्लाईड शोमध्ये दाखवावीत त्याप्रमाणे भूकंपाची ती चित्रं सटासट त्याच्या डोक्यात येत होती आणि नाहिशी होत होती. ते उखडलेले हायवे, ज्वाळा, धूर, सगळीकडे पडलेले ढिगारे, ती चित्रांची साखळी काही केल्या थांबेचना!
शिमोने तिचा कान त्याच्या उघड्या छातीवर लावला
"अशा होतं ब-याचदा", ती म्हणाली
"उंहुं."
"त्याने त्रास करुन घेऊ नकोस."
"मी प्रयत्न करेन", कोमुरा म्हणाला
"पण पुरुष या गोष्टीने त्रास करुन घेतातच, तुम्ही कितीही सांगा त्यांना"
कोमुरा यावर काहीही बोलला नाही
शिमाओने त्याच्या निप्पलशी खेळ करत विचारलं,
"तुझ्या बायकोने चिठ्ठी लिहून ठेवलेली, असं तू म्हणालास नाही का?"
"हो"
"काय लिहिलं होतं त्यात?"
"त्यात लिहिलं होतं की, माझ्यासोबत राहाणं म्हणजे हवेच्या एखाद्या तुकड्यासोबत राहाणं आहे"
"हवेच्या एखाद्या तुकड्यासोबत?" शिमाओने डोकं उचलून कोमुराकडे पाहिलं, "म्हणजे काय?"
"म्हणजे, माझ्याआत काहीसुद्धा नाही असं असेल"
"आणि ते खरंय?"
"असू शकेल", कोमुरा म्हणाला, "पण मला खात्री नाही. माझ्यामध्ये काहीही नाही असं असू शकेल, पण मग, माझ्यामध्ये ते जे काहीतरी असायला हवं होतं ते काय असतं?"
"हो, खरंच की, ते काहीतरी काय असावं? माझ्या आईला ना, सॅल्मन स्किन प्रचंड आवडायची. ती सॅल्मन स्किनसाठी इतकी पागल होती की तिला सॅल्मनमध्ये स्किनशिवाय दुसरं काहीही असू नये असं वाटायचं. तिची केस पाहिली की आत काहीच नसणं इतकं काही वाईट नसावं असं वाटतं, तुला काय वाटतं?"
फक्त स्किनने बनलेला सॅल्मन कसा असेल याची कोमुरा कल्पना करुन पाहात होता. चला एक वेळ मानूयात की अशी काहीतरी गोष्ट असेल, पण सॅल्मन फक्त स्किनचा बनलेला असेल तर स्किनही काहीतरी आतलीच गोष्ट असू शकेल, नाही का? कोमुराने एक खोल श्वास घेतला, त्यासरशी त्याच्या छातीवरचं शिमाओचं डोकं सावकाश वरखाली झालं.
"बाकी काही असो, पण मला एक गोष्ट नक्की सांगता येईल..", शिमाओ म्हणाली, "म्हणजे मला माहित नाही की तुझ्या आत काहीतरी आहे किंवा नाही, पण तू एक मस्त माणूस आहेस. तुला समजून घेणा-या आणि तुझ्या प्रेमात पडणा-या अनेक स्त्रिया जगात असतील."
"त्यात तेही होतं."
"कशात? तुझ्या बायकोच्या चिठ्ठीमध्ये?"
"अंहं"
"बरीच आहे म्हणायची तुझी बायको", शिमाओ म्हणाली. तिचं ते इयरींग त्याच्या छातीला घासलं.
"आता आपण या विषयावर आहोतच तर", कोमुरा म्हणालं, "मी जो बॉक्स घेऊन आलो होतो त्यातलं ते काहीतरी काय असेल?"
"तुला ही गोष्ट छळतेय?"
"नाही, आतापर्यंत तरी छळत नव्हती, पण मला माहित नाही का ते, पण आता छळायला लागलिये"
"कधीपासून?"
"आत्तापासून"
"अचानक?"
"हो, मी विचार करायला सुरुवात केली आणि अचानकच"
"आता अचानकच तुला ती गोष्ट का छळायला लागलीये हे मला समजत नाहिये"
एक मिनीटभर छताकडे टक लावून पडलेला कोमुरा म्हणाला, "मलाही".
मग ती दोघं बाहेर सुसाटलेल्या वा-याचं घोंघावणं ऐकत बसली. तो वारा कोमुराला अज्ञात असलेल्या प्रदेशातून येत होता आणि तो असलेल्या जागेवरुन त्याला अज्ञात असलेल्या कुठल्यातरी दुस-या प्रदेशाकडे जात होता.
"मी सांगू तुला असं का वाटतंय ते?" शिमाओ ऐकू येईल न येईल अशा आवाजात कुजबुजली. "कारण, त्या बॉक्समध्ये तुझ्या आतलं ते काहीतरी होतं. तू तो बॉक्स इथे घेऊन आलास तेव्हा तुला ते माहित नव्हतं आणि तू तो बॉक्स तुझ्या हाताने किकोला दिलास, आता ते तुझ्या आतलं काहीतरी तुला कधीच परत मिळणार नाही."
कोमुरा मॅट्रेसवर उठून बसला आणि त्याने त्याच्या बाजूच्या बाईकडे पाहिलं. नकटं नाक, कानाच्या पाळीवरचे तीळ. त्या रुमच्या शांततेमध्ये त्याच्या ह्रदयाची धाडधाड खूपच जोरात ऐकायला होत होती. तो तिच्या दिशेने झुकला तशी त्याची हाडं कराकरा वाजली. एक सेकंद कोमुराला वाटलं की आपण काहीतरी भयंकर करुन बसणार आहोत.
"मी मस्करी करत होते", तिने कोमुराच्या चेह-यावरचे भाव पाहून म्हटलं, "मी माझ्या डोक्यात जे आलं ते सांगीतलं. मी असा जोक करायला नको होता, आयॅम सॉरी, प्लीज हे पर्सनली घेऊ नकोस. मला तुला दुखवायचा अजिबात हेतू नव्हता."
कोमुराने महत्प्रयासाने स्वतःला शांत केलं आणि पुन्हा उशीवर डोकं ठेवून पहुडला. त्याने डोळे मिटून घेतले आणि खोलखोल श्वास घेतला. तो भलामोठा पलंग त्याच्या सभोवताली एखाद्या काळ्याशार समुद्रासारखा पसरला होता. त्याचं ह्रदय अजून धडधडत होतं.
"आतातरी आपण खूप लांब निघून आलोय असं वाटतंय का?" शिमाओने विचारलं.
"हं, आता मला वाटतंय खरं, की, मी खरंच खूप लांब निघून आलोय." कोमुराने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलं.
शिमाओची बोटं कोमुराच्या छातीवर एक डिझाईन गिरवत होती, एखादा जादुई मंत्र टाकल्यासारखी..
"पण अगदी खरंखरं सांगू का", ती म्हणाली, "तू आताशी कुठे सुरुवात केली आहेस."
--
पुस्तकः आफ्टर द क्वेक
हारुकी मुराकामी
अनुवादः श्रद्धा भोवड
(ही कथा १९९५मध्ये कोबे, जपान येथे झालेल्या ७.३ रिश्टर स्केलच्या महाप्रचंड भूकंपानंतर लिहिली गेली होती. त्यानंतर तिला ’द न्यूयॉर्कर’च्या १९ मार्च, २००१च्या आवृत्तीत प्रसिद्धी देण्यात आली. आता ही कथा हारुकी मुराकामी याच्या ’आफ्टर द क्वेक’ या कथासंग्रहाचा एक भाग आहे.)
हारुकी मुराकामी
अनुवादः श्रद्धा भोवड
(ही कथा १९९५मध्ये कोबे, जपान येथे झालेल्या ७.३ रिश्टर स्केलच्या महाप्रचंड भूकंपानंतर लिहिली गेली होती. त्यानंतर तिला ’द न्यूयॉर्कर’च्या १९ मार्च, २००१च्या आवृत्तीत प्रसिद्धी देण्यात आली. आता ही कथा हारुकी मुराकामी याच्या ’आफ्टर द क्वेक’ या कथासंग्रहाचा एक भाग आहे.)