मिकन् म्हणे -

मिकनला जाग आली तेव्हा सभोवताली अजूनही काळोख होता.

"मिकन्, डोळे उघडले नाहीस तर तुला काळोखच दिसणार."
मिकनच्या आतून एक आवाज त्याला असं काहीतरी सतत सांगत असतो. तो आवाज कुठून येतो हे काही मिकनला अजून समजलं नव्हतं. वूडीच्या आतून "आय हॅव्ह स्नेक इन माय बूट!" असा आवाज येतो पण त्याच्यामध्ये एक मशीन असतं म्हणून. आपल्या आत कुठे मशीनेय?
मिकनने पडल्यापडल्याच त्याची बंडी वर करून पुन्हा एकदा पाहून घेतलं आणि मान हलवली.

आई घरी नसते तेव्हा ती बाबा आणि मिकनसाठी चिठ्ठ्या लिहून ठेवते. 'मिकन्, खाताना रडायचं नाही.' 'मनू, मिकन कुठे आहे ते बघ.' 'मनू, मिकनला भूक लागलिये का बघ.' आणि त्या चिठ्ठ्या कुठेही मिळतात.. बाथरूममध्ये, बाहेरच्या अंगणात, फळांच्या टोपलीमध्ये, बाबाच्या बूटात, कुकरमध्ये.. कसली धमाल...
आपण झोपलेलो असताना आई आपल्या पण आत त्या चिठ्ठ्या भरून ठेवते  आणि त्याच चिठ्ठ्या आपल्या आत वाजतात यावर मिकनचा पूर्ण विश्वास होता.
"पण अजून डोळे का उघडत नाहीये?"
मिकनने डोळे बंद असतानाच मोठे करून ताणून उघडण्याचा प्रयत्न केला. पण छे! डोळे उघडेचनात. आईच्या लोणच्याच्या बरणीच्या झाकणासारखे चिकटून बसले होते ते.
मिकनला एकदम भीती वाटायला लागली. आपले डोळे कधीच उघडले नाही तर?
मिकन् घाबरून आईला हाक मारायला गेला, तर त्याच्या घशातून आवाजच फुटेना.
हे म्हणजे बाबाच्या गाडीसारखं झालं. आई त्याला 'खटारा' म्हणते. बाबा गाडीला चावी लावून फिरवतो तेव्हा पहिल्यांदा काहीच होत नाही. असे दोन तीन निष्फळ प्रयत्न झाल्यानंतर मिकन् बाबाकडे पाहतो, बाबा आईकडे आणि आई वर आभाळाकडे..
आई? आई कुठेय?
"आईsss"  मिकनने हाक मारली, पण मग त्याला आठवतं की, तीन दिव झाले, आई नाहीये इथे.
त्याच्या घशात एकदम दुखलं.
मिकनच्या त्या केविलवाण्या हाकेवर गुडनाइटच्या लाल दिव्यावर बसलेली फेअरी गॉडमदर मात्र फिस्सकन् हसली आणि मिकनने त्याचं पांघरूण डोक्यावरून गच्च ओढून घेतलं.
"ना!"
पण दुसऱ्याच क्षणी त्याने ते खस्सकन ओढून फेकून दिलं.
"नाही मिकन्..अजिबात घाबरायचं नाही."
दॅट् राइट.. मिकनने खसाखसा डोळे चोळले आणि एकदाचं त्याला बाबाच्या चष्म्यातून पाहिल्यासारखं अंधुक दिसायला लागलं. आणि त्याला दिसलं की, फेअरी गॉडमदरने तिच्या झाडूला किक मारलिये आणि ती त्याच्याकडेच यायला निघालिये.
मिकनचं अचानक चार पायाचं मांजर होतं आणि तो पाठीची कमान करून पायाच्या ढेंगांमधून पाहायला लागतो.  
"बरोब्बर मिकन्.. डोकं खाली, बम वर."
डोकं खाली करून पाहिलं की जग किती वेगळं भासायला लागतं. ती गेअरी फॉडमदर सुद्धा.
मिकनने तिच्याकडे खाली डोकं वर बम करून पाहिलं तशी ती तिच्या झाडूसकट उलटी पालटी होऊन मशीनवरून खाली पडली आणि फटाका फुटल्यासारखी नाहिशी झाली.
बाबाने शिकवलेली ट्रिक आजपण मिकनच्या कामी आली. य्ये!!
पण..
घर इतकं रिकामं का वाटतंय?
बाबा? मिकनचा आवाज परतलाय.
बाsबाsss
टप्पी बॉल या भिंतीवरुन त्या भिंतीवर आपटत जावा तसा मिकनचा आवाज घराच्या कानाकोपऱ्यातून घुमत घुमत विरला पण बाबाचा ओss काही आला नाही.
"आपलं घर काय सांगुळवाडीची दरी आहे का?"
 खरंच होतं ते. आपलं घर खूपच मोठंय असं मिकनला खूपदा वाटे.

आता मात्र मिकन उठला.
अर्धवट झोपेत डोलकाठीसारखं डुलत मिकनने हॉलमध्ये डोकावून पाहिलं, पण बाबा तिथे नव्हता. किचनमध्येही पाहिलं, पण बाबा तिथेही नव्हता.
"बाबा कुठेय?"
त्याने पाहिलं की, बाथरुमच्या दारातून बाबाच्या पायाचे ओले ठसे बेडरुमपर्यंत गेले होते. पण बाबा बेडरुममध्येही नाही.
तेवढ्यात मिकनची नजर दरवाज्यावर गेली.
"मिकन..पाहिलंस का?"
दरवाजा उघडा होता आणि दरवाजाच्या बाहेर घातलेलं कुंपण उघडं होतं.
मागच्या वेळी मिकनने चिमणीच्या मागे धांदरटपणे धावताना कपाळाला खोक पाडून घेतल्यानंतर आईने ते कुंपण घातलं होतं. आई किंवा बाबा सोबत असल्याशिवाय बाहेर जायचं नाही अशी सक्त ताकीद होती मिकनला. मागच्या वेळी आईची नजर चुकवून बाहेर गेला असताना आईने पाठीत घातलेले धपाटे आठवून मिकनची पाठ आताही हुळहुळली.
तेव्हापासून मिकन् ती लक्ष्मणरेखा पाळत होता.  लक्ष्मणरेखा ओलांडल्यावर सीताजींचं जे काय झालं ते झालं, पण आईच्या डोळ्यातला राग आणि तिचा अबोला.. नको रे बाबा
"पण आई इथे नाही, नाही का मिकन्?"
पण आपण इथे कुंपण ओलांडल्याचं आईला तिथे दूर बसूनही कळेल आणि ती तिथे दूर बसूनही आपल्यावर रागवेल या भीतीने मिकन् कुंपणापासून थोडं दूरच उभा राहिला आणि त्याने कंबर वाकवून कुंपणावरुन बाहेर पाहिलं.
बाबा दूरदूरपर्यंत दिसत नव्हता.

एका चिमणीने त्याला शुक शुक केलं, मिकनने तिच्याकडे दुर्लक्ष केलं.  एका मांजराने त्याला हात मारुन खेळायला बोलावलं, पण मिकनने त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं
मिकनने आता मांडी ठोकली आणि आज्ञाधारकपणे कुंपणाच्या आत बसून राहिला..आईच्या गोष्टींमधल्या आज्ञाधारक मुलासारखा..
"सरडेराव आजही दिसत नाहीत, नाही?"
दोन दिवसांपूर्वीच मिकनला एक सरडेबुवा अंगणात जोर काढताना दिसले होते आणि मिकनला एकदम बाबाची आठवण झाली होतं. त्याला वाटलेलं, बाबाही जोर काढताना असाच दिसतो.
पण त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मात्र सरडेबुवा उगवले नाहीत, तेव्हा मिकनला आश्चर्य वाटलं होतं
ज्यांना पाहायचं असतं ती माणसं दर दिवशी तशीच आणि तिथेच असण्याची आणि त्यांना हवं तेव्हा पाहता येण्याची सवय असलेल्या मिकनला हे असं कसं काय हे समजलं नव्हतं.
दर दिवशी उठल्यावर पाहावं तर आई टेबलापाशी बसून काहीतरी लिहीत असते,  बाबा पेपर वाचत असतो, किचनमधून गरम चपात्यांचा मस्त वास येत असतो. गुऱ्या नेहमीसारखा झोपलेला असतो.
मग बहुधा सरडेबुवांचं वेळापत्रक आईसारखं, बाबा म्हणतो तसं 'स्ट्रिक्ट' नसेल, असं मिकनला वाटलं.
पण एकंदरीतच - सगळ्या गोष्टी एखाद्या दिवशी असतील तशा दुसऱ्या दिवशी असतीलच असं नाही असं काहीतरी कळून घेतल्याने मिकनला फार हुशार असल्यासारखं वाटलं.
"हे सरडेबुवा बाबासारखे बिलकुल नाहीत. बाबा नेहमी जोर काढतो. या सरडेबुवांसारखा सुट्टी घेत नाही."
अगदी बरोब्बर!
तेवढ्या मिकनचं पोट गुरगुरलं.
असे हुशार विचार केले की मिकनला हटकून भूक लागायची.
"मिकन, बाबा नाही आहे. रेडी?"
मिकनचा चेहरा अचानक खुलला आणि त्याने नाकात बोट घातलं. नाकाच्या आत बोट गरागरा फिरवून नाकात कालपासून वाढवत ठेवलेलं मेकूड काढायला मिकनला तब्बल ५ मिनिटं लागली.
"मागच्या वेळेपेक्षा मोठं आहे नाही?"
नाकातलं ते वाटाण्याइतकं मेकूड चारी बाजूने निरखून पाहताना मिकन बाबा घरात नाही हे देखील विसरला आणि ते मेकूड मळून मळून त्याची हाजमोलासारखी गोळी करुन चघळताना मिकनला त्यानंतरची पाच मिनिटं चोरुन कुंपण ओलांडतानाही झाला नसता तितका आनंद झाला.

पण अजून काही बाबाचा पत्ता नव्हता.
आता काय ब्र करावं याचा विचार करत करत मिकनने हॉलला एक फेरी मारली. फक्त भिंतींच्या कडेकडेनेच नाही, तर हॉलच्या एका कोपऱ्यापासून ते दुसऱ्या कोपऱ्यापर्यंतही फेऱ्या मारता येतात, हा नवा शोध त्याला हल्लीहल्लीच लागला होता. भिंतींच्या कडेकडेने फिरताना ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार दोनदा म्हणून होतं, पण या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत जाताना तीनदा म्हणून होतं. हे कसं काय हे त्याला आईला विचारायचं होतं.
पण आई इथे नाही.
मिकनने दाराजवळच्या चपलांच्या स्टॅंडकडे पाहिलं. आई तिच्या सगळ्या रंगबिरंगी चपला घेऊन गेली होती. आता त्या स्टॅंडवर फक्त बाबाचे काळे आणि तपकिरी बूट उरले होते. मिकनने बाबाच्या एका बूट खाली पाडला आणि त्यात स्वत:चा पाय घातला. बूटाच्या आतला किंचीतसा ओलपरपणा मिकनच्या तळव्यांना भिडला.
मिकनला अगदी बाबाच्या पायावर उभं राहून चालल्यासारखं वाटलं.
.
.
"मिकन्, बाबा कुठेय?"
अजितकाका दाराच्या बाहेरुन विचारत होता.
खलीसारखा उंच असा हा अजितकाका स्कूटीवरुन दूधाची बादली घेऊन यायचा.
बाबा त्याला 'मिल्कमॅन' म्हणायचा. सुपरमॅन, बॅटमॅन काय, त्यांच्या स्वत:कडे पॉवर असते, पण हा मिल्कमॅन साऱ्या जगाला पॉवर देतो, असं म्हणत बाबा त्याला नमस्कार करायचा. मिकननेही त्याला नमस्कार घातला.
"मिकन्, हा मिल्कमॅन आई आणि बाबा दोघांनाही आत्ता इथ्थे आणायची पॉवर देईल काय?"
मिल्कमॅनकडे मान वर करून तोंड उघडं टाकून विचारात गढलेल्या मिकनला आईची एकदम सरसरुन आठवण झाली, बाबा अजून आलेला नाही ते आठवलं, आई तिच्या बॅगा घेऊन कुठेतरी गेलिये हे आठवलं आणि आपल्यालाही बॅगा घेऊन ती गेलिये तिथे जायचंय ते आठवलं, तिथे जाईपर्यंत आपल्याला आई दिसणार नाही हे देखील आठवलं आणि इतके सारे विचार एकाच वेळी यायची सवय नसलेल्या मिकनने डोक्यातली गर्दी सहन न होईन ओठ काढून भोकाड पसरलं.
"अरे मिकन्, काय झालं?"
बाबा काखेत पेपरांचा मोठा गठ्ठा घेऊन परतला होता आणि अगदी अचंब्याने एका पायात बूट घालून रडणाऱ्या मिकनकडे पाहात होता.
"बाबा आपल्याला 'मिक्या' सोडून 'मिकन्' बोलायला लागलाय"
बाबाला समोर पाहून मिकनचं रडणं बटण ऑफ व्हावं तसं खट्टकन् थांबलं.
"मला काय माहीत तू लवकर उठशील?"
बाबा मिल्कमॅनकडून दूध घेता घेता बोलला. 
सगळ्या गोष्टी एखाद्या दिवशी असतील तशा दुसऱ्या दिवशी असतीलच असं नाही ही आपल्याला कळलेली गोष्ट बाबाला अजून कळायची आहे असं मिकनला वाटलं आणि त्याला बाबा जरा जास्तच आवडायला लागला.
"आईपेक्षा जास्त??"
मिकनच्या आतला आवाज कधीकधी त्याला असं काहीतरी कठीण विचारे.
बाबाकडे पाहात असताना आपल्याला काहीतरी समजतंय, पण काय समजतंय ते समजत नाहीये असं काहीसं मिकनला वाटलं.
"मिकन्, काय खाणार कॉर्नफ्लेक्स की पोहे?"
आणि मग समोर आलेल्या कॉर्नफ्लेक्सवर आई घालते तशाच अॅप्पलच्या पातळ फोडी पाहून मिकनला वाटलं की, आई काय आणि बाबा काय एकसारखेच आहेत. आई नसते तेव्हा बाबा तिची जागा घेतो आणि बाबा नसतो, तेव्हा आई त्याची जागा घेते.
म्हणून आई इथे नाही याचं जास्त रडायला येत नाही.

"मिकन्, मला काय वाटतंय माहितिये का? मला वाटतंय तुझ्या आईने इथे CCTV  कॅमेरा लावलाय"
बाबाला कॉर्नफ्लेक्सच्या डब्यात एक चिठ्ठी मिळाली होती आणि त्यावर लिहिलं होतं-
'मनू, बाहेर जाताना कुंपणाला कडी घालायला विसरू नकोस.'
CCTV म्हणजे काय हे मिकनला माहीत नव्हतं. आई भेटली की तो तिला विचारणार होता.
"बरंss, का रडू फुटलेलं आपल्याला
बाबा त्याचं कॉर्नफ्लेक्स घेऊन समोर बसला होता.
नुसतेच कॉर्नफ्लेक्स. दूध नाही, अॅप्पल नाही.
"बाबा, आय मिस्ड यू"
बाबा, आय मिस्ड यू! 
मिकनच्या आतला आवाज त्याला काय वाटतं ते खरंखरं बोलायला शिकवत होता.
बाबाने आश्चर्याने मिकनकडे पाहिलं.
"मी इथेच आहे तरी? अच्छा, तुला म्हणायचंय, यू मिस्ड आई?"
तेच ते. मिसिंग बाबा म्हणजेच मिसिंग आई.
पण, बाबाला काय सांगणार. त्याला अजून खूप गोष्टी कळायच्या आहेत.
मिकनने हसत मान हलवली आणि कॉर्नफ्लेक्स ओरपायला सुरुवात केली.

--

याआधीचे: मिकन् मिकन् आणि गुऱ्या | मिकन् आणि पायपर

No comments:

 
Designed by Lena