तुम्ही ’चारशे कोटी विसरभोळे’ वाचलंय? ’सात सक्कं त्रेचाळीस’ वाचलंय? नसतील वाचली तर ही पुस्तकं वाचल्यानंतर येणारं झपाटलेपण काय आहे हे कळणं शक्य नाही. आणि हे झपाटलेपण येत नसेल तर मी अंगात आल्यासारखी रात्रीची ’बेगम बर्वे’ या नाटकावर ही पोस्ट का लिहीतेय याचाही जाम पत्ता लागणं शक्य नाही. पण लिहीणं माझ्यासाठी गरजेचं आहे. मी सकाळपर्यंत थांबले की रात्रीचे विचार मूर्खपणाचे वाटणार याची खात्री आहे. मग मी ते कधीच लिहीणार नाही आणि मग ते विचार आकसत आकसत जरदाळूच्या टणक बी सारखे होणार आणि माझ्या मेंदूत खडखड करत बसणार, त्यापेक्षा लिहीते. मग ते विचार आणि तुम्ही -काय ते बघून घ्या.
तर, बेगम बर्वे-

मला एकच पुस्तक पुन्हापुन्हा वाचायची खोड आहे.पुस्तक पुन्हापुन्हा वाचलं की दुसरया-तिसरया वाचनात आपल्याला पहिल्या वाचनात कळलं त्यापेक्षा वेगळ्यारितीने कळतंय असं माझं मलाच जाणवतं. अर्थात मी ’बेगम बर्वे’सुद्धा तीन वेळा वाचलं.
मी ’बेगम बर्वे’ पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला अत्यंत जुनी प्रत वाचायला मिळाली होती, त्यात आळेकरांच्या पुढच्या ’बेगम बर्वे’च्या नव्या आवृत्त्यांमध्ये आहे तसं रेखा साने-इनामदार यांनी केलेलं ऍनालिसिस नव्हतं, त्यामुळे माझं पहिलं वाचन हे अजिबात इन्फ़्लूएन्स्ड नव्हतं, त्या वाचनात इतरांचे रेडीमेड विचार मिसळून त्याचं निव्वळ पॉलिटीक्स झालं नव्ह्तं, नाटक मुघल काळात घडतंय की कोणत्या-याचीही कल्पना नव्हती, एकदम कोरी पाटी. त्यामुळे मला पहिल्यांदा ’बेगम बर्वे’ जे कळलं ते काहीसं असं होतं-
यातला श्यामराव बुली आहे, शिवराळ आहे, डॉमिनंट, ऑब्सेसिव्ह आहे आणि अत्यंत लबाड आहे असा प्राथमिक निष्कर्ष मी काढला जो कोणीही काढेल.
हे सबंध नाटक थोडं थोडं वास्तव आणि थोडी थोडी फ़ॅंटसी यात घडते.
या नाटकात बर्वे ’गे’ असण्याचा किंवा शामराव आणि बर्वे यांच्यामधल्या लैंगिक संबंधांचा थेट उल्लेख कुठेही नाही-त्यांचं नातं होस्ट आणि पॅरासाईट सारखं आहे, या नाटकाची थीमच मुळी परावलंबनातून आलेली गुंतागुंत आहे. जावडेकर बर्वेवर, मित्र म्हणून बावडेकरवर, बर्वे श्यामराववर, श्यामराव त्याच्या मनाविरुद्धा आर्थिक कारणांकरता बर्वेवर, बर्वे पहिल्यांदा श्यामराववर नंतर जावडेकरवर, जावडेकर -बावडेकर नोकरीवर असं परावलंबनाचं मोठठच्या मोठठं जाळं आहे. ह्यातली एखादी लिंक निसटली की त्याचं नाटक होईल अशा रितीने ते घडवल्यासारखं आहे.
बावडेकर हे पात्र फ़ारशा सुस्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर आलंच नाही, संपूर्ण नाटकात ते अंडरडॉगसारखं वाटत राहिलं, बर्वे जावडेकरांबरोबर आल्याने जावडेकरांच्या पात्राला वॉक-ओव्हर मिळालाय पण बर्वे बावडेकरांबरोबर असता तर जावडेकरांचा बावडेकर झाला असता असं वाटत राहिलं.
बर्वे हाच नलावडेबाई आहे, श्यामराव हाच सूत्रधार कम प्यून आहे, एका बेअरींगमध्ये असताना ते अचानक निसटल्यासारखे दुसरया बेअरींगमध्ये शिरतात. उदा.-नलावडेबाई अचानक बत्तीविषयी, कंपनीच्या मालकाविषयी बोलायला लागते हे मला कळलं.
एकंदरच जे शुद्धीवर असताना, सगळे सेन्सेस सतर्क असताना घडू शकत नाही असं वाटतंय ते फ़ॅंटसीत घडतंय असा ढोबळ नियम लावला की नाटक कळलंय असं वाटू शकतं असं मला पहिल्या वाचनात वाटलं.
--
श्यामराव हा बहुजन समाजाचा आहे (असं साने-इनामदार यांनी ’बेगम बर्वे विषयी’ या त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे) हे मला काही पहिल्यांदा लक्षात आलं नव्हतं, नंतर लक्ष देऊन वाचल्यावर त्याच्या भाषेवरुन असा अर्थ निघू शकतो असं वाटतं पण तसं असलंच पाहिजे याची गरज नाही वाटली किंवा त्याने काही फ़रक पडतो असे वाटले नाही . मी संगीत नाटकं बघितलेली नाहीत, मी नुकताच आलेला ’बालगंधर्व’ हा पिक्चर सुद्धा बघितलेला नाही. मला तो बघावासाच वाटला नाही. त्यामुळे बर्वेचं त्या काळात रमून असणं, त्याची गायलेली पदं, त्याचा नॉ्स्टॅल्जिया मला भिडला नाही, मला फ़क्त त्याच्या पुरुषी देहातलं सरावलेलं स्त्रीपण कळलं, मला तेव्हढं पुरेसं वाटलं. आता मला असं वाटणं चूक की बरोबर की थोडं थोडं चूक, थोडं थोडं बरोबर हे माहीत नाही.
नंतर वाचताना मला ही फ़ॅटसी नसावीच असंही एका ठिकाणी वाटून गेलं. यातली पात्रं भ्रमात जगतात असं वाटलं पण फ़ॅंटसी आणि भ्रम यांत मी मला स्वत:लाच पटेलसा हुशार फ़रक (स्वत:लाच) सांगू न शकल्याने नंतर तो विचार कटाप केला. स्त्री ’अफ़ोर्ड’ न करु शकण्यापायी जावडेकरांनी मेल बर्वेमधल्या फ़ीमेलवर भागवून घेतलं असावं (नो फ़ॅंटसी, पण चॉईस नसण्यातून किंवा डेस्परेशनमधून) आणि पुढच्या ज्या घटना बर्वेच्या पुरुष असण्याला कॉंट्रॅडीक्ट करत जातील त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, किंवा वेळ मारुन नेणे असा प्रकारही वाटला, पण त्याही वाटण्यात नंतर दम राहिला नाही.
नंतर मला प्रश्न पडला की ही ह्या चौघाजणांची कलेक्टीव्ह फ़ॅंटसी आहे (एकमेकावर ओव्हरलॅप होणारी) की जावडेकर, बावडेकर, बर्वे किंवा शामराव यापैकी कोणातरी एकाचीच? म्हणजे हे बर्वेच्याच फ़ॅटसीमध्ये घडतंय का कुणाच्या? की ही या चौघांपेक्षाही वेगळ्या कोणाचीतरी फ़ॅटसी आहे? नाटककाराची? म्हणजे हे सगळं नाटक आळेकर आपल्या डोक्यात घड्वतायेत आणि हे चौघे रोल प्ले करतायेत आणि त्यांना वाटेल तेव्हा ते ट्विस्ट आणणार आहेत, त्यांना वाटेल तेव्हा ते एखाद्याला भलताच रोल करायला सांगणार आहेत.
म्हणजे मी जर वाचताना ती पात्रं स्टेजवर कशी वावरतायेत हे इमॅजिन करत असेन (म्हणजे मी करतेच) तर ही चौघं असताना स्टेजवर नसलेले(नाटककार) आळेकर त्यांना कठपुतळीसारखं नाचवतायेत असा फ़ील यावा ,म्हणजे त्यांचा अदृश्य वावर किंवा नसूनही ’असणं’ व्हॉटेव्हर जाणवत रहावं असं काहीतरी. म्हणजे कथानक घडतंय पण त्या कथानकात ही चौघं असूनही ती ते कथानक घडवत नाहीत. हे आता बघतोय ते झालं एक नाटक पण नाटककाराच्या मनात असेल तर तो दुसरंही काही घडवू शकला असता, आताही घडवू शकेल असं सारखं वाटत राहतं.
आता ह्यातलं बरोबर किती, चूक किती हे मला माहित नाही, असं मला वाटलं खरं.
प्रत्येक फ़ॅंटसीला अंत असतोच, शेवटी फ़ॅंटसीतून बाहेर पडून सत्यसृष्टीत यावंच लागतं अशा अर्थाचा शेवट वाचताना मात्र "च्यायला! हे असंच होणार हे आपल्यालाही माहित होतं की!" असा फ़ील आला. तो शेवट मात्र आळेकरांनी जसा आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या रितीने केला नसता असं वाटलं.
मलातरी ’बेगम बर्वे’ वाचून काय आठवलं माहित आहे का? मला एकाच वेळी तीन गोष्टी आठवल्या.
एक म्हणजे ’लेगो’ गेम. त्यात तुकड्यांवर तुकडे जुळवून ड्रायव्हर, गाडी, ट्रॅक्टर वगैरे बनवायचा असतो. एखादंदुसरंच मूल असं असतं जे ड्रायव्हरच्या जागी ड्रायव्हरला न बसवता तिथे चाक लावून बघेल, गाडीच्या चाकाच्या सिमिट्रीवर काहीतरी प्रयोग करुन बघेल, मागची चाकं मोठी आणि पुढची छोटी असं काहीतरी मॉडेल असेल तर पुढेच मोठी चाकं लावून ती कशी कलंडते हे बघेल, हे सगळं करुन झाल्यावर मात्र तो ते मॉडेल जसं असायला हवं होत किंवा ऍटलीस्ट सगळे जसं म्हणतायेत किंवा ब्रोशरमध्ये जसं दाखवलंय तशा रितीने्च असेंबल करेल. मला ’बेगम बर्वे’ हा सतीश आळेकरांनी केलेला असाच काहीतरी खेळ वाटला.
किंवा मग चित्र बघतानाची पद्धत.
म्हणजे मी चित्र बघताना आपण वाचताना करतो तशी चित्राच्या डाव्या कोपरयाकडून सुरुवात करते. मग चित्राचा अवकाश, चित्रातली रंगसंगती, एकंदर पोत डोळ्यांनीच (क्वचित हात लावून) चाचपते.पण समजा, माझी चित्र बघायची सवयीची पद्धत सोडून मी भस्सकन चित्राच्या मध्यभागीच नजर खुपसली तर काय होईल? चित्राच्या कडेकडेने प्रवास करून मध्यभागी येण्यापेक्षा मी मध्यभागापाशी सुरुवात करुन कॉन्सेंट्रीक सर्कल्स मध्ये चित्र बघत गेले तर कसं? किंवा वरुन खाली चित्र बघत येंण्यापेक्षा खालून वर बघत गेले तर दुसरया पद्धतींनी बघितल्यावर उमटलेलं चित्र पहिल्या पद्धतीने बघितल्यावर डोक्यात उमटलेल्या चित्रापेक्षा वेगळं असेल का? दुसरया पद्धतीने मला पहिल्या पद्धतीने जेव्हढं कळलं तेव्हढं चित्र कळेल का? असा विचार माझ्या डोक्यात येतो. तेव्हा मग वाटतं की न कळायला काय झालं? चित्रातले इथले तिथले तपशील एकत्र करुन ते डोक्यात सुसंगत जुळवायला लागतील एव्हढंच.
’बेगम बर्वे’ मला चित्र बघायची ती दुसरी पद्धत वाटली. अगदी लिटरली नाही, पण बरीचशी तशी.
किंवा मग पाब्लो पिकासोने एक ढांसू तंत्र विकसित केलं होतं ते म्हणजे क्युबिझ्मचं, ते आठवलं. क्युबिझम म्हणजे एक पूर्ण चित्र असतं तर ते फ़ाडून, डीकन्स्ट्रक्ट करुन होतं तसं न लावता मनाला येईल तसं, मूड लागेल तसं लावलं की कसं दिसेल, तशी तो चित्रं काढतो. म्हणजे तो मुळातच चित्र काढताना ते डीकन्स्ट्रक्ट केल्यावर कसं दिसेल तसंच चित्र काढतो. त्याला क्युबिझ्म म्हणतात.
असं खूप खूप, काय काय वाटलं. हे वाटलं ते मी अर्थात ज्यांनी ’बे.ब’ वाचलंय त्यांच्याबरोबर शेयर केलं. मला ह्या वाचकांत दोनच प्रकार दिसले. एक- हे नाटक पूर्ण समजलंय असा दावा करणारे आणि दोन- हे नाटक अजिबातच समजलं नाही असं मान्य करणारे. मला अधलंमधलं त्रिशंकू कोणी भेटलंच नाही. बरयाच जणांना त्यांच्या मते खूप ऑब्व्हियस प्रश्न पडले होते जे मला पहिल्या वाचनात सुद्धा पडले नाहीत (Yes, I am bragging). उदा. बर्वेला दिवस जातात. हे कसं काय. पुरुषाला दिवस कसे काय जाऊ शकतील? बर्वे स्त्रीवेशात स्त्री म्हणून खपून जाईल कदाचित पण जावडेकरला कळलं असेलच नं, they are supposed to be नवरा-बायको, right? इत्यादी.
मी ती ’चर्चा’ तिथेच बंद केली हे सांगायची गरजच नाही.
तर हे असं झालं.
’बेगम बर्वे’ लिहीण्याला कारणीभूत झालेले तीन प्रसंग आळेकरांनी त्यांच्या मुलाखतीतून वारंवार सांगीतलेत आणि ते फ़क्त तेव्हढंच सांगतात. पण ते तीन प्रसंग त्यांनी अशारितीने एक्झिक्यूट का केलेत हे मात्र ज्याचं त्यानं करायचं इंटरप्रीटेशन आहे, आळेकर त्याची मजा बघत बसतात. माझं इंटरप्रीटेशन मी माझ्यापद्धतीने केलंय,चूक-बरोबर याचा न खेद आहे न खंत.
पण पात्रं कल्पून वाचणं आणि ती प्रत्यक्ष रंगमंचावर दृश्य झालेली पाहणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एलकुंचवारांची गार्बो वाचणं आणि मोहित टाकळकरच्या गार्बोला पाहणं ह्या दोन वेगळे अनुभव होते. पुस्तक वाचून डोकं भीsssर्र् झाल्यावर आता मला 'बेगम बर्वे’ पाहायचं होतं.
काल माझं तेही पाहून झालंय.
तो वाचनापेक्षा अंमळ सोपा प्रकार आहे हे मात्र खरं. डोक्याला एव्हढं गिरमिट लागत नाही.
12 comments:
वाचलं पण नाहीये आणि पाहिलं पण नाहीये!!
पण तुझी पोस्ट वाचून एक मात्र नक्की झालं....वाचायला सुरुवात केली तेव्हा 'बी. बी' (कि बे. ब ??) वाचावं असा वाटायला लागलं आणि पोस्ट संपता संपता वाचण्याचा प्लान रद्द करून नाटकंच पहावं हे निश्चित केलं!! आणि हे करून पण बहुदा मी दुसऱ्या गटात असेल असा अंदाज आहे. सो लेट्स सी!!
इतक्या वर्षांनी त्याचे इतके सारे अर्थ लावता येतात म्हणजे जबरदस्त असणार नाटक .. मी वाचलही नाही आणि पाहिलही नाही ...पण आता मिळवून वाचतेच.
यापुढे हा ब्लॉग नियमितपणे वाचलाच पाहिजे, इतकं कळलं.
रहावत नाही म्हणून थोडं आणखी.
संदिग्धता हे कलेचं सामर्थ्य असतं, न्यून नाही. बेगम्बर्वे इतकं संदिग्ध आहे, की ’मला ते पूर्ण कळलं,’ असा दावा करणं जरा अतीच होईल. आणि ज्याचं त्याचं कळणं ज्याचं त्याचंच असेल.
ज्यांना संगीत नाटक आणि स्त्रीपात्रांची प्रायव्हेट आणि पब्लिक गोची माहीत नाही, अशा पिढीलाही इतकं झपाटणारं नाटक त्या काळापुरतं नाही; ’अक्षर’ आहे, हेसुद्धा निश्चित.
हेमंत कर्णिक सर,
अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
खरंय, पूर्ण कळलंय हा दावा करणं अतिच, पण अर्थ हाताशी आलाय असं आपलं आपल्यालाच वाटतं असं अनेकदा घडतं. पुन्हा एखाद्या गोष्टीचा उलटसुलट विचार करणं ही शिकवण असेल आणि सुलट याचा अर्थ उलट्याच्याही उलटा असा घेत असू तर असे अनेक 'lurking' अर्थ हाताशी आपसूकच येतात, ते शेअर करण्याचा हेतू होता. बस्स, बाकी काही नाही. मला या विचारांचा ऊरभरुन अभिमान आहे.
’स्त्रीपात्रांची प्रायव्हेट आणि पब्लिक गोची’ याबद्दल मला फ़ारसं ज्ञान नाही पण कल्पना करणं अवघड नाही, नाही का? पण अशी सिम्बॉलिक गोची मला तेवढीशी रिलेटीव्ह वाटत नाही हे खरं.
@गीता,
कसलाही किंतु-परंतु डोक्यात न ठेवता बघ. अनेकदा असं होतं की कुठेतरी काहीतरी वाचलयसं करुन आपण काहीतरी वाचतो-बघतो. पण शिफ़ारस करण्याच्या मतांचा आपल्यावरच प्रभाव म्हणता टळत नाही. तू काही दुसरया कॅटॅगिरीत वगैरे बसत नाहीस, बिनधास्त बघ. साधं-सोप्पं आहे ते, कठीण फ़क्त माझी उलटा-सुलटा विचार करायची पद्धत आहे.
तू नाटक बघितलंस/वाचलंस की बोलू मग. तोपर्यंत कसल्याही किंतु-परंतुंवर चर्चा करण्यात काही हशील नाही.
aativas,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
खरंच वाचा किंवा बघा, कसंही. त्यानंतर बोलूच वाटलं तर.
कधीकधी असं होतं की मी वारेमाप स्तुती केलेलं काहीतरी समोरच्याला मिडीयॉकर आणि जडबंबाळ वाटू शकतं. तुम्ही वाचून/ बघून तुमच स्वत:चा अनुभव घ्या आणि शेअर करा हवं तर. :)
Begum Barve in a way was much ahead of its time. It talked about sexual orientation when hardly anybody was talking about it in India. As I wrote to you earlier, somehow Alekar didn't his due is what I felt strongly.
Somehow don't know why but I guess play needs to be watched than read. It is important that director reads it and reads it again till all possibilities are explored. That media got developed due to sheer power it has otherwise a play writer could easily have written a story or poem
sapatnekarache mool he natak sudha bagh...tyachyavar sumitra ranadene movie banavala aahe,DVD available aahe..
संवेद,
सिंबॉलिकली किंवा थेट वाचा फ़ोडणं या दोघांपैकी पद्धत कुठलीही असली असली तरी वाचा फ़ुटणे हा झाला हे महत्वाचे वाटते मला आणि सतीश आळेकरांनी या धार्ष्ट्याबद्दल सोसलंही खूप. त्या काळात त्यांच्याकडून आजच्या काळतल्या आपण अजून एक्स्पेक्ट करणं खूपच होईल.
रुपेश,
’सापत्नेकरचे मूल’ याबद्दल मी नाही कधी ऐकलेलं. काय आहे ते मिळवून नक्की वाचेन/बघेन.
मलाही हे नाटक विलक्षण वाटतं. मी वाचेलेलं नाही, पाहिलं आहे. पण नाटक पूर्ण कळलं आणि अजिबात कळलं नाही असे दोनच पक्ष युम्हला भेटले ह्याचं नवल वाटत्ल्म. मी ह्या दोन्हीच्या मधे कुठेतरी आहे.माझ्याबरोबर हे नाटक पाहिलेल्यानाही असंच वाटत होतं; काही कळलंय, काही कळलंसं वाटतंय आणि बरंच काही उलगडायचंय.
Reality - fantasy चा खेळ यात विलक्षण ताकदीने साकारलाय, असं मात्र नक्की वाटतं.
@ प्रीती,
अभिप्रायाबद्दल थॅंक्स!
नाटकाविषयी बोलला आहात ती सोला आने सच बात आहे. मी पोस्टमध्ये लिहील्याप्रमाणे मी स्वत: त्या त्रिशंकू प्रकारातली आहे. मला भेटलेल्या दोन कॅटेगिरीज बद्दल म्हणाल तर मला असे दोन प्रकारचेच लोक भेटले, त्याला काय म्हणणार? फ़ारशी लोकं ऍनालिटीकल नसतात, असलीच तरी ते ऍनालिसिस त्यांचं त्यांच्यापुरताच ठेवतात. किंवा करत असतील आणि माझ्याबरोबर शेअर केलं नसेल तर काय घ्या.
पण आहे हे असं आहे.
Post a Comment