टोटोरो

तुम्हाला वाटतं का, की जगत राहण्यासाठी एक गोल, एक उद्दीष्ट लागतं?
हो, मला वाटतं तसं.. ते नसेल तर  वा-यावर भिरभिरणा-या पाचोळ्यासारखं असेल आयुष्य.. पण,
माझे गोल्स, माझी उद्दीष्ट्यं वेळोवेळी बदलत राहिलेली आहेत हे देखील तितकंच खरं..

कधी कधी कोणताही ग्रॅंड प्लॅन नकोच असतो. नेहमी नेहमी सगळं ठरवून कसं घडणार अथवा घडवून आणणार? काही काही वेळा गोष्टी आपल्या कह्यापलीकडच्या असतात. काही काही फक्त श्वास घेत राहणंच पुरेसं असतं. काही काही वेळा आला दिवस जगून पार करणं इतकंच ध्येय असतं. अशावेळी आधार वाटावा अशा गोष्टींना पकडून आपण तगून राहातो. हिसाइशीचा चेलो, मुराकामी, माझ्या गावातला गावाइतकाच जुना असलेला पुराणवड हे माझं सर्व्हायव्हल किट आहे आणि त्यात खूप आधीपासून आहे - मियाझाकी. साधारण आठेक वर्षांपूर्वी मला त्याच्या एका सिनेमाने जगण्याचं अपरिमित बळ दिलेलं आणि तो सिनेमा होता स्टुडिओ जिबलीचा 'माय नेबर टोटोरो'.

'माय नेबर टोटोरो' हा लहान मुलांचा सिनेमा नाही. स्टुडिओ जिबलीचा कोणताच सिनेमा लहान मुलांचा नाही.

--

मे आणि सात्सकी शहरातून एका गावात राहायला येतात. त्यांची आई त्या गावाजवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये असते. तिला काय आजार आहे याची वाच्यता या चित्रपटात शेवटपर्यंत नाही. तिला बरं नाही इतकंच आपल्याला कळतं, आणि तितकंच पुरेसं असावं नाही का? तिला कोणता आजार झाला आहे हे जाणून घेऊन काय मिळणार? मे आणि सात्सकीचं आडनाव कुझुकाबे आहे हे तर कळतं, पण तिच्या वडिलांचं नाव काय, आईचं नाव काय.. हे या सिनेमात कुठेही नाही, पण त्याने काही अडत नाही. डिटेल्सची हाव,  वेडगळ हव्यास मियाझाकी पुरता मोडीत काढतो. सिनेमा पाहताना डोक्यातली डिटेल्सची अडगळ कमी झाल्याने सिनेमाचा आनंद जरा आणखी वाढला हे आपल्याला सिनेमा संपल्यावर खूप प्रकर्षाने जाणवतं.

सात्सकी शाळकरी पोर आहे आणि मे बाबांच्या बरोबर घरीच राहाते. बाबांना युनिव्हर्सिटीत जायला लागतं, तेव्हा शेजारच्या आज्जीकडे राहाते. असंच एकदा खेळता खेळता मे जराशा दाट झाडीत लपलेल्या एका कापराच्या झाडाच्या ढोलीत जाऊन पडते आणि तिला भेटतो टोटोरो (उच्चारी तोतोरो).


हा टोटोरो मस्त गुबगुबीत अस्वलासारखा असला तरी केसाळ राक्षस वाटावा इतका प्रचंड आणि अकराळ विकराळ आहे. मोठमोठाले दात, अणकुचीदार नखं, गडगडाटी जांभया असाव्यात असा आवाज...हा अवतार पाहून कोणीही घाबरेल; पण मे थेट त्याच्या जेलीसारख्या पोटावर जाऊन बसते, शिस्तीत त्याचं नाव विचारते आणि त्याने भलामोठा आवाज काढून दरडावल्यासारखं केलं तर त्याच्याहून मोठा आवाज काढून त्याला स्तिमित करते. आता-
मला अकराळ विकराळ वाटणारा टोटोरो मेला क्यूट का वाटावा? थेट त्याच्या पोटावर जाऊन झोपावं इतका विश्वास तिला का वाटावा?
निरागसता - आणखी काय! वय वाढत जातं तसं आपल्याला हा स्यूडो स्क्रिझोफेनिया जडत जातो. हा अविश्वासाचा, संशयाचा चष्मा लावूनच आपण सर्व गोष्टींकडे पाहायला लागतो. इतके फटके खाल्लेले असतात की प्रत्येक गोष्टीकडे संशयाने बघायची, प्रत्येक गोष्टीचा बागुलबुवा करायची सवय जडते. असं कोणावरही विश्वास न ठेवता जगणं खूप थकवणारं असतं, तुमची कसोटी पाहणारं असतं. हा सिनेमा पाहिल्यानंतर मी मेसारखं होऊन पाहिलं.. किमान प्रयत्न करून पाहिला. विश्वास ठेवलाच नाही, तर विश्वास ठेवायचा की नाही हे कसं कळणार हा  तेव्हा अक्कलखाती जमा झालेला धडा. मग मी माणसांवर विश्वास ठेवून पाहिला, चान्स देऊन पाहिला आणि त्यातून होणारा पश्चातापविरहित आनंद अनुभवला. आणि मग, आयुष्य जरा सोपं होत गेलं.

--

मे अर्थातच टोटोरोबद्दल सात्सकी आणि बाबांना सांगते, पण तिचे बाबा तिला वेड्यात काढत नाहीत, किंवा तिला भास होतायेत का असं वाटून चिंतीतही होत नाहीत. उलट ते टोटोरोला गार्डियन एंजल मानतात. मे आणि सात्सकीसारखा तो त्यांना अर्थातच दिसत नाही, पण त्याने ते मेला किंवा सात्सकीच्या उत्साहावर विरजण घालत नाहीत. जपानी लोककथांनुसार टोटोरो हे जंगल स्पिरिट आहे, पण अशा गोष्टींची भीती वाटायला हवी ही कल्पनाच मुळी हा सिनेमा मोडीत काढतो. काहीही शक्य आहे..काहीही शक्य का नसावं? हं?

टोटोरो मे आणि सात्सकीच्या सोबतीला येतो, त्यांना एकटं वाटतं, सभोवतालचं वास्तव त्यांच्या अंगावर येऊ पाहतं तेव्हा त्यांना आकाशातल्या सफरीवर नेऊन आणतो. नंतर मे हरवते आणि तिला शोधण्यासाठी म्हणून सात्सकी टोटोरोची मदत मागते तेव्हा टोटोरो सगळ्यांना कॅटबसमधून घरी घेऊन येतो. सगळ्या अडचणींमधून मार्ग निघू शकतो असा विश्वास देतो.


वाढता अंधार, पावसाची रिपरिप, आई हॉस्पिटलमध्ये आजारी, बाबा कामावर आहेत, त्यांची कामावरून घरी यायची वेळ झाली आहे पण ते येत नाही आहेत, बाबा नसणा-या बस बाजूने निघून जातायेत, मुली शांतपणे जीवाचा धडा करून बाबांची वाट पाहात आहेत, पण बाबा काही येत नाही आहेत..अशा त्या जीव कसनुसा करणा-या सात मिनिटांच्या सीनमध्ये आपलं काळीजही जड होत जातं. पण मग टोटोरो येतो आणि थोड्या वेळापूर्वी भिववणारा अंधारी पाऊस मग तितकासा भिववणारा उरत नाही. त्याच्या थोड्याशा तऱ्हेवाईक पण बालिश करामतींनी तो मूड हलका करतो.. माझ्याकडे पण एक टोटोरो असता तर काय...असं आसुसून वाटायला लावतो.


--

आम्ही लहानपणी चटक्याच्या बिया गोळा करायचो. त्या बिया घासल्यावर त्याच्या आतल्या काळा कुळकुळीत, चिकूच्या बीच्या रंगाचा अंतर्भाग उघडा व्हायचा. दुधाचं भांडं किशीने घासताना, वरचं किटण निघून स्टीलचा चमचमता चंदेरी भाग उघड होताना जसं एक अननुभूत समाधान मिळतं, तसं हे बी घासताना वाटायचं. ते बी आणखी घासलं की तापतं आणि त्वचेला लावलं की चिमटा लावल्यासारखं चावतं आणि चटका देतं. त्या बियांचं आकर्षण संपलं आणि मी गुंजाच्या बिया गोळा करायला लागले. सांगायचा मुद्दा असा की, आपण मोठे होत जातो तसं आपलं या गोष्टीतलं आकर्षण संपतं. आपल्याला वेगळ्या गोष्टींची आस लागते. फरक इतकाच की, या बदललेल्या आसेची किंमत मात्र फार मोजावी लागते. माझ्या चटक्याच्या बिया असोत, किंवा मे-सात्सकीने अनुभवलेली ओकच्या बियांमधून झाड उगवण्याची निसर्गाची जादू असो.. या छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणा-या आनंदासाठी कोणतंही व्याज मोजावं लागत नाही. म्हणूनच त्याला निर्व्याज आनंद म्हणत असावेत. मोठं झाल्यावर कोणीतरी ही जाणीव करून द्यायला लागते. मला ती मियाझाकीच्या या सिनेमाने करून दिली. म्हणूनच प्रत्येक दिवशी टेक पार्कच्या ढुंगणाला रग लावणा-या त्या बसच्या सीट्सवर बसून घरी जाताना त्या मौमौ कॅटबसमध्ये बसून घरी जाता आलं असतं तर काय बहार आली असती असं वाटून मन आजही उगीचच खुशालतं.

मियाझाकीच्या प्रत्येक सिनेमातून संयमाची गोष्ट सांगीतली जाते..हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. टोटोरो मे आणि सात्सकीला भेट म्हणून ओकच्या झाडाच्या बिया देऊन जातो, पण बियांमधून रोपं येईपर्यंत वाट पाहावी लागणार हे मे आपणहून शिकते..टोटोरो आहे या विश्वासाने शिकते. कधीकधी अशा गोष्टी 'आहेत' इतका विश्वासही पुरेसा असतो. 'माय नेबर टोटोरो'ने मला अशा अनेक गोष्टी दिल्या. मियाझाकी, हिसाइशीसारख्या प्रतिभावान कलाकारांची ओळख करून दिली, नॉस्टॅल्जिया दिला, छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायची सवय लावली, जगण्याचं बळ दिलं, उठून कामाला लागायची उभारी दिली. हिसाइशीचं काझे नो तोरेमिची आज आठ वर्षांनंतरही माझ्या घशात आवंढा आणतं. इतकं कवळं, इतकं निष्पाप सहन होणार नाही असं वाटायला लावतं..आपण याच्या लायक नाही आहोत, काय केलं म्हणजे हा ऊर फाटण्याइतपत झालेला आनंद आपण लीलया पेलू शकू? इतकी लायकी मिळवू शकू? असं वाटायला लावून एकप्रकारचं येडटाक डेस्परेशन आणतं.

--

प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असा एक काळ येतो की, दर दिवशी उठल्यावर आपल्याला वाटतं की आज काही निभत नाही आपलं. आपण नाही जगत आता. प्रत्येकाच्या आयुष्यात असे डार्क पिरीयड्स येतातच. कोणाचे काही दिवस टिकतात, तर कोणाकोणाचे वर्षानुवर्षं. आज ते दिवस आठवले की आपल्याला असं दर दिवशी वाटलेलं हे आठवतं आणि हसूही येतं. तरीही आपण दर दिवशी उठलो, हट्टाने तरलो, जगलो. आपण निभावून नेलं ब-यापैकी..इथपर्यंत येऊन पोहोचलोच की नाही शेवटी. पण हे काम एकट्याने शक्य होत नाही बहुतेक वेळा. त्याला बरेच बाह्य घटक, काही कॅटलिस्ट्स कारणीभूत असतात. ते तुम्हाला बळ देतात. अंधा-या वाटेवर चाचपडत असाल, तर तुम्हाला प्रकाशाची तिरीप दाखवून आधार देतात, योग्य दिशा दाखवतात, जगण्यात राम आहे याची नवी जाणीव करून देतात. माझ्यावर मियाझाकीचं प्रचंड ऋण आहे हे त्याचसाठी.

मियाझाकीच्या प्रत्येक चित्रपटातून मला जगण्याचं बळ मिळत गेलं, माझ्या छातीवर जगण्याचं प्रचंड ओझं होतं, ते हळूहळू कमी होत गेलं, जीवाला जडलेली कायमची अस्वस्थता कमी झाली. सोफीने हाउलला शापातून बाहेर काढावं, युबाबाच्या जुलमी जगात चिहिरोने हाकूकडे मन हलकं करावं तसं मियाझाकीने माझं केलं. मियाझाकीने त्याच्या  सिनेमातून निसर्गाचं मोठेपण सांगीतलं आहे. त्याच्यापुढे नतमस्तक झालं तर निसर्ग तुमची पाठराखण करतो हे तो त्याच्या सिनेमामधून दाखवतो. कारण, निसर्ग तुम्हाला स्थैर्य देतो..आयुष्यात काहीही उलथू देत तिथं- बियांची झाडं होतात.. झाडांची अरण्यं होतात..बियांची फुलं होतात आणि फुलांची फळं..

थोडक्यात, शेवटी सगळं काही छानच होणार असतं. फक्त त्या 'शेवटी' पर्यंत तगायचं असतं आपल्याला.
शेवटी चांगल्या गोष्टींना वेळ लागतोच..नाही का?

--

सध्या आपल्या सभोवताली आता जे सुरू आहे ते 'डार्क पिरीयड' म्हणावं असंच आहे. असं म्हणतात की, कल्पक मन असेल तर वास्तवाचा सामना सहज करता येतो. मियाझाकीच्या सिनेमातलं कल्पक वास्तव तुम्हाला हात देऊन भयंकर वास्तवाच्या गर्तेतून बाहेर काढतं. चार वर्षांपूर्वी मी चाचपडत होते तसं कोणी चाचपडत असेल, भरकटलेलं असेल, तर अशा गरजवंतांना या सिनेमातून मदत मिळावी म्हणून हा लेखनप्रपंच आहे.

तुम्हाला तुमचा टोटोरो मिळो!

5 comments:

वैदेही said...
This comment has been removed by the author.
वैदेही said...

हा अत्यंत आवडता चित्रपट. पण खरं सांगू का, मला आता चित्रपटांची भावनिक समीक्षा (आणि ज्यात चित्रपटाची कथा सांगितली आहे) वाचणं जीवावर येतं. त्यामुळे लेख आवडला नाही. पण आवडत्या चित्रपटाविषयी लिहलंय म्हणून ही पोचपावती.
तुला वेळ असेल तर NHK World वर 10 years with Miyazaki म्हणून मोठ्ठी डॉक्युमेंटरी आहे, ती नक्की बघ (पाहिली नसशील तर‌)
मला Ghibli चा सर्वात आवडलेला चित्रपट Up On the Poppy Hill आहे. आणि तो गोरोचा चित्रपट आहे. मियाझाकी गोरोबाबत अनावश्यक क्रूर वागतो :( त्यामुळे मियाझाकी वगळता Ghibli मला अतिशय आवडते. मियाझाकी आवडतो, नाही असे नाही. Poppy Hill नंतर आवडलेले चित्रपट Only Yesterday, My Neighbors Yamadas. Only yesterday तर एका रम्य पावसाळी रात्री हलकं चढत जाणाऱ्या सुंदर मद्यासोबत पाहावा. My Neighbors Yamadas मात्र लवकर उतरणाऱ्या Tangy drink सोबत.

Shraddha Bhowad said...

हेलो वैदेही,

संपूर्ण कमेंटविषयी मला खूप प्रश्न आहेत, पण ते पुन्हा केव्हातरी.
आर्टिस्ट की आर्टिस्ट्री, कलाकार की कलाकारी या प्रश्नाचं उत्तर माझ्यापुरता कलाकारी हे आहे. असं असल्याने मला मियाझाकीच्या आयुष्याबद्दल, त्याच्या प्रोसेसबद्दल किंचीतही कुतूहल नाही किंवा त्याच्या आणि गोरोच्या डायनॅमिक्सविषयी. ते पाहणं म्हणजे आपल्याला आनंद झाल्यावर मेंदूतली सेरॉटॉनिनची पातळी किती होती, किती झाली, कशाने झाली हे मोजून पाहण्यासारखं वाटतं. 'पोर्को रोस्सो' आणि 'अप ऑल पॉपी हिल' हे माझ्या सर्वात कमी आवडीचे जिबली सिनेमे आहेत. त्यांच्या कथेत जीव कमी असल्याने असेल, किंवा ते पाहून माझे हात रिकामे राहिल्याने असेल, पण आहेत खरं. पण प्रत्येकाची आवड वेगळी..
आवर्जून दिलेल्या पोचपावतीबद्दल मनापासून आभार. :)

-श्रद्धा

Nil Arte said...

Loved it!

Shraddha Bhowad said...

निलेश,

मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी गेलं. तुझ्या कमेंटला उत्तर द्यायचं राहिलं ही उपरतीही त्या काळातली.
आवर्जून कळवल्याबद्दल थॅंक्स! I mean it.

-श्रद्धा

 
Designed by Lena