बिस्किट-विस्किट!

का कोणास ठाऊक, पण मला माझ्या आवडत्या माणसासोबत बिस्किटं भाजायला आवडतील असं कायम वाटत आलंय.

ज्या गोष्टी मला जमत नाहीत त्या इतरांसोबत करायचा हव्यास का? आणि बिस्किटंच का? माझा पेने कधीच जमला नाही, मला पावही भाजायला जमत नाही. पण मग मला माझ्या आवडत्या माणसासोबत पाव भाजायला आवडेल का? उं..नाही. मग बिस्किटांचं आणि माझं हे अजब कनेक्शन का आहे?

सुदैवाने आमची परिस्थिती बरी होती आणि आता माझी परिस्थिती खूपच बरी आहे.. त्यामुळे, मी कधी भुकेला बिस्किटं खाल्ली आहेत असं झालं नाही. बिस्किटं खावीशी वाटली म्हणून खाल्ली, जी बिस्किटं खावीशी वाटतात ती खाल्ली, पण एक मात्र आहे - ती जितकी खावीशी वाटतात, तितकी कधीच खायला मिळाली नाही. माझ्या आईने ते कधीच होऊ दिलं नाही. तीन मुलं असलेल्या घरात ते होऊ देणं तिला त्या काळी परवडणारं नव्हतं. म्हणून ट्रेभरून बिस्किटं बनवून ती सर्वच्या सर्व आपणच खायची (आणि एखाद-दुसरं त्या लाडक्या माणसाला द्यायचं) ही माझी लाडकी फॅंटसी असू शकेल का? शक्य आहे.

माझं आणि बिस्किटांचं जास्त सख्य नाही. माझं आणि कॉफीचं आहे, माझं आणि अंड्याचं आहे त्याला सख्य म्हणतात. मी बिस्किटांना 'ठेवून आहे' असं म्हटल्यास जास्त संयुक्तिक ठरावं. असं असलं तरी मी माझ्या हयातीत शंभरेक प्रकारची बिस्किटं खाल्ली असतील. पण, प्रत्येकाचे 'टॉप थ्री' असतात तसे माझेही आहेत. टॉप तीन पुस्तकं, टॉप तीन मूव्हीज, टॉप तीन रेसिपीज, टॉप तीन ओशाळवाणे क्षण, टॉप तीन ब्रेकअप्स, टॉप तीन रॉकबॉटम मोमण्ट्स.. तशीच टॉप तीन बिस्किटं.

सगळी सुंदर सुंदर सुवचनं जशी अज्ञात माणसाने/बाईने लिहिलेली असतात, तशाच आपल्या बऱ्याचशा आवडत्या गोष्टी देखील अनाम, ब्रॅंडनेम नसलेल्या असतात. कुठल्यातरी बाजारातून उचललेल्या, ट्रेनमधल्या फेरीवाल्याकडून घेतलेल्या, बहिणीच्या मैत्रिणीने बहिणीला दिलेल्या, पण आपल्याला आवडतात म्हणून मागून घेतलेल्या..कधीकधी बिनदिक्कत चोरलेल्या.. काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये कुठल्यातरी लोककलाकाराकडून हौसेने घेतलेल्या.. तसंच माझ्या या सर्वात आवडत्या बिस्किटाला नाव नाही. आम्ही त्याला 'क्रीम बिस्किट' असंच म्हणायचो. सामान्यनामाचा वापर विशेषनामासारखा करण्याचा धेडगुजरी प्रकार आम्ही तेव्हाच शिकलो. असो.. तर-

क्रीम बिस्किट.
लंबगोल आकाराच्या त्या बिस्किटाला मध्ये गोलात गोल असावी तशी लंबगोल, खोल खाच असायची. त्याला 'भोक' तरी कसं म्हणावं? शंकराचा क्रोधायमान तिसरा डोळा उभा ठेवावा तशी ती खाच दिसायची. खाचेमधल्या त्या लाल-लाल जेलीमध्ये साखरेचे दाणे पेरलेले असायचे. माणकासारखी लालभडक जेली. सिंदबादला प्रत्येक बेटावर हटकून माणकं मिळायची ती याच रंगाची असतील असं फार वाटायचं तेव्हा. सध्या मिळणारं 'जिम जॅम' नावाचं बिस्किट या बिस्किटाच्या पासंगालाही पुरायचं नाही. स्पष्टच सांगायचं झालं तर, त्यातली जेली पंडुरोगी आणि क्रीम पुचाट आहे.  क्रीम बिस्किटाचं हे प्रकरण फक्त इतक्यावरच संपायचं नाही. ते बिस्किट उघडल्यानंतर त्यात म्हातारीच्या कापसासारखं गुलाबी रंगाचं क्रीम असायचं. हे क्रीम फक्त जिभेने चाटून चांगलं लागायचं. एखादे दिवशी दाताने खरवडून खाल्लं तरी त्याला वेगळाच गोडवा यायचा. हे सगळं संपवून उरलेलं बोडकं बिस्किट खायचा मूड नेहमी असायचाच असं नाही. तो बिस्किट बेस अतिशय चांगला होता..काही वादच नाही. त्याला नेमक्या भाजलेल्या बिस्किटांना असतो तसा टॅन झालेला सोनेरी रंग आणि खमंग वास असायचा. पण त्या वयात ती जाण असणं शक्यच नव्हतं. क्रीम खाल्ल्यानंतर ते खाणं आम्हाला शिक्षा वाटायची चक्क! अशी बिस्किटं आम्ही आईला दिसू नये म्हणून ड्रॉवरमध्ये, किचनच्या कप्प्यामध्ये लपवून ठेवायचो आणि नंतर सपशेल विसरून जायचो. नंतर घर साफ करताना ही मुंग्या लागलेली पाच-पन्नास बोडकी बिस्किटं आईच्या हाती लागली, तेव्हा सडकून मार खाल्लेला आठवतो. पाठीवर पडलेल्या माराने ही बिस्किटं क्रीमसकट खायची सवय लागली. त्यानंतर मी आजतागायत कोणतंही बिस्किट फक्त क्रीम आधी, बेस नंतर अशा जहागीरदारी पद्धतीने खाल्लेलं नाही. हे लाललाल जेलीचं पिठूळ गोड बिस्किट माराच्या, लाललाल वळांच्या कडू-गोड आठवणींसकट आठवणींमध्ये हुळहुळतं ते असं.

त्यानंतर आम्हाला वेड लावलं ते पिस्ता बिस्किटांनी. गेर बेकरीवाल्याच्या काचेच्या जाडजूड बरणीत कधीही न संपणाऱ्या जेंगासारखी गोलगोल मांडून ठेवलेली ही सुंदर सोनेरी पिवळ्या रंगांची बिस्किटं कितीही खा, कमीच! ती बिस्किटं आणायला जाणं हादेखील एक सोहळा असायचा. इतकं महाग बिस्किट म्हणजे आमच्यासाठी एक अप्रूप होतं तेव्हा. कोणत्याही खाण्याला नेहमी लागतात त्यापेक्षा अंमळ जास्तच पैसे घेऊन जाणं म्हणजे आम्हाला रूबाब वाटायचा. 'पिस्ता बिस्किटं' द्या सांगीतलं, (तेही आजूबाजूच्या चार लोकांनी ऐकलंच पाहिजे इतक्या मोठ्या आवाजात सांगीतलं जायचं) की बेकरीवाला पहिले एक पारदर्शक दुधी रंगाची प्लॅस्टिकची पिशवी काढायचा. मग हळूहळू त्या बरणीचं झाकण फिरवायचा. त्याला कसलीच घाई नसायची, ना आम्हाला. त्याने आपल्याला सर्वच्या सर्व बिस्किटं अख्खी द्यावी म्हणून आम्ही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचो. त्याने त्या वर्तुळाकार जेंगाच्या बाजूने हुशारीने लपवून ठेवलेली तुटकी बिस्किटं आम्हाला देऊ नये म्हणून आमची कोण घालमेल व्हायची. कधीकधी तो नुकतीच भाजलेली बिस्किटं भरलेला ट्रे बाहेर आणायचा तेव्हा आमचं जे व्हायचं, त्याला 'अराउझल' म्हणतात हे मला खूप नंतर कळलं. मग तो एक एक करत बिस्किटं त्या दुधी रंगाच्या पिशवीत भरायचा आणि त्या पिशवीची वरची दोन टोकं गरागरा फिरवून, त्याच्या पीळाची गाठ मारून आमच्या हातात अलगद ठेवायचा. अशी अख्खी बिस्किटं घेऊन आम्ही विजयी वीरासारखे घरी आलो, की नंतर त्या बिस्किटांच्या वाटावाटीवरून मारामारी ठरलेली. सुंदर हिरव्या पिस्त्याची सर्वात जास्त पखरण असलेलं बिस्किट आपल्याकडे यावं म्हणून अक्षरश: चढाओढ लागायची. नंतरच्या काळात लिटिल हार्ट्स मध्ये सर्वात जास्त वितळलेली साखर असलेलं हार्ट आपल्याकडे यावं म्हणून हजारो नाटकं केली, पण पिस्ता बिस्किटांच्या काळातल्या नाटकांची आणि रडण्या-भेकण्याची सर कशालाच नाही.

त्यानंतर,
पूर्ण पंधरा वर्षांचा काळ लोटला, त्यात डाएटिंगची फॅडं केली, फॅडं सरल्यानंतर देशी-विदेशी अनेक बिस्किटं खाल्ली. कुकीज नामक श्रीमंती प्रकार खाल्ला, फळं घातलेली, लिक्युअर घातलेली अजब बिस्किटं खाल्ली, पण त्यातल्या एकाचीही चव जिभेवर वर्षानुवर्षं रेंगाळत राहिलीये, असं झालं नाही. उद्या आणून खायचंय या विचारानेच बरं वाटावं असं एकही बिस्किट त्यानंतर हातात आलं नाही. पण खूप खूप वर्षांनी म्हैसूरला बस स्टॅंडवर वेळ काढायला म्हणून खावं म्हणून युनिबिकचं हनी ओटमील कुकीज/ बिस्कीट हाती आलं आणि बिस्किट पर्वाची पुन्हा एकदा सुरुवात झाली. अत्यंत खडबडीत, टाळूला खरचटेल इतका टोकदार पृष्ठभाग असणारं हे ओबडधोबड बिस्किट जिभेवर ठेवून लाळेत भिजवलं की अशक्य रसाळतं. त्यातला मध शोषून घेत-घेत शेवटी ओटमीलचा चोथा आंबोणासारखा रवंथ करत खाताना ब्रह्मानंदी टाळी लागते. त्यातली थोडीशी करपलेली बॅच मिळाली तर मला हॉरक्रक्स मिळाल्यासारखा आनंद होतो. मी सध्या हे बिस्किट ठेवून आहे.

या बिस्किटांची जाहिरात मी कधीही पाहिली नाही. किंबहुना, या बिस्किटांना कधी जाहिरातीची गरज भासली नाही. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून, कधीकधी खाकी पिशवीमध्ये किलोवर मिळणारी ही बिस्किटं आमच्यासाठी आनंदाचा ठेवा होती. नंतर नंतर, मिलानो, ओरियो, कराची बेकरीची बिस्किटं खाऊनही ही बिस्किटं आठवत राहिली. अजूनही मी बेकरीत जाऊन प्लॅस्टिकच्या पिशवीतून पिस्ता बिस्किटं घेऊन येते, टंपासभर चहा करते आणि मन भरेस्तोवर बिस्किटं खाते. दिवस वाईट गेला असेल, तर मी घरी जाताना हनी ओटमील बिस्किटं घेऊन जाते आणि जिभेवर विरघळणाऱ्या त्या छोट्या छोट्या बिस्किटांप्रमाणे माझी छोटी छोटी दु:खं नाहिशी होतील अशी कल्पना करून पाहाते. बरं वाटतं. कधीकधी एखादं बिस्कीट हातातनं टपकन चहात पडतं, ते बिस्किट सहीसलामत काढण्याच्या रेस्क्यू मिशनवर गेलेलं दुसरं बिस्किट देखील चहात नाहीसं होतं, तेव्हा आणखी तीन-चार बिस्कीटं टाकून त्याचा काला करून खाते. बिस्किट पॅक खोलावं आणि पाच बिस्किटांमधल्या दोन-तीन बिस्किटांचा चुरा होऊन भुसकट झालेलं असावं..असं अनेकदा होतं. पण चालायचंच. बिस्किटांनी मला 'मूव्हिंग ऑन' नावाचा प्रकार शिकवला. दहापैकी नऊ वेळा माझे प्रश्न आल्याचा चहा आणि ही बिस्कीटं खाता खाता सुटले आहेत. ब्लॅंकेटवर पडून बिस्कीटांमागून बिस्किटं संपवताना आलेल्या फूड कोमामध्ये माझी झकास झोप झालेली आहे. अशी झोप मला ट्रिपल कोर्स बफे जेवण घेऊनही आलेली नाही.

बालपणीच्या माझ्या आठवणींमध्ये आईने आणखी बिस्किटं द्यायला नकार दिल्याने ती चोरून कोपऱ्यात लपून खात बसल्याच्या खूप आठवणी आहेत. त्या वेळचा तो अडगळीच्या कोपऱ्यातला अधमुरा प्रकाश, माझ्या दहा सेंटिमीटर परीघात दरवळणारा तो भाजलेल्या मैद्याचा वास, पाठीला टोचणारी अडगळीतली चटई, टाकून दिलेल्या इडलीच्या भांड्यावर बसलेला बोटभर जाडीचा धुळीचा थर, बिस्किट खाता-खाता हाती लागलेलं अडगळीतलं आलम-आरा आणि त्यातून नकळत्या वयात कळलेलं एक सर्वथा नवं जग.. हे सर्व आहे. आता हळूहळू अंधुक होत चाललेल्या आठवणींचं गाठोडं अधूनमधून उपसते तेव्हा ही आठवण हटकून बाहेर येते. का? ते माहीत नाही. आधी म्हटलं तसं..अजब नातं आहे खरं.

आठवणीत ठेवण्यासारखं इतकं देऊन ठेवलेल्या अशा गोष्टी विसरता येणं थोडंच शक्य आहे?

2 comments:

Meghana Bhuskute said...

अहा. लेख. टंक. मागच्या पडद्याचा रंग. सगळंच.

Shraddha Bhowad said...

लब्यू..!

 
Designed by Lena