चार्ल्स बुकोव्हस्की.. नाम तो सुना होगा.
नसेल ऐकलं.. शक्यता कमी आहे.
सगळ्यांनाच माहीत असायला चार्ल्स बुकोव्हस्की म्हणजे शेक्सपियर नाही. ज्याचं लिखाण सगळ्यांनाच झेपत नाही, पचत नाही, 'शून्यवादी' वाटतं अशा काही निवडक लेखकांपैकी तो एक आहे..म्हणजे, होता. तो कोणत्याही अभ्यासक्रमात 'लावलेला' नाही किंवा कोणत्याही साहित्य चळवळीचा झेंडा घेऊन त्याने तो मिरवला नाही. लेखनाची जातकुळी सांगायची झालीच, तर ती काहीशी काफ्काच्या जवळपास जाणारी होती, पण तुलनेत जास्त रोखठोक आणि प्रामाणिक होती. असं असलं, तरी तो आत्मश्लाघ्य नाही, 'आत्मताडन' हा त्याचा स्वभाव नाही. आपण काय आहोत याची पूरेपूर जाणीव असलेला लेखक म्हणजे बुकोव्हस्की.
बुकोव्हस्कीने वयाच्या २४व्या वर्षापासूनच लिखाणाला सुरुवात केली. त्याने स्वत:चं लेखन प्रकाशित करण्याचा खूप प्रयत्न केला, खूप साऱ्या प्रकाशनगृहांना त्याने त्याचं लिखाण पाठवलं, पण काही यश मिळालं नाही. त्यामुळे कंटाळून त्याने १० वर्षं लिहायचंच सोडलं. त्या १० वर्षांमध्ये तो अक्षरश: भणंगासारखा जगला. पण, लिखाणावाचून आपण जगत नाही, आपलं काही खरं नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने परत लिहायला सुरुवात केली. त्याने लेखन प्रकाशित करण्याचा अट्टाहास सोडला, पण लेखन सोडलं नाही. असंच लिखाण करता करता त्याला सूर सापडला, लिखाणाला ओघ आला आणि वयाच्या ४९व्या वर्षी त्याला लेखक बनण्याची संधी मिळाली.
कारकिर्द म्हणून त्याच्या लिखाणाची सुरुवात झाली ती अशी. वयाच्या ७५ व्या वर्षी त्याला मरण आलं तोपर्यंत २५ वर्षं त्यानं झपाटल्यासारखं लिहिलं. त्या २५ वर्षांमध्ये त्याने ६ कादंबऱ्या, ३५ कवितासंग्रह, १५ लघुकथासंग्रह आणि आणखीनही बरंच काही, असं दमदार काम केलं.
पोस्टऑफिस - ११ वर्षं पोस्टऑफिसमध्ये काम करणाऱ्या आणि एक छदामही पदराशी न ठेवता त्या नोकरीला रामराम ठोकणाऱ्या माणसाची कथा
फॅक्टोटम- एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडणाऱ्या भुंग्यासारखी नोकरी बदलणाऱ्या माणसाची कथा
विमेन - बाईमागून बाई बदलत जाणाऱ्या माणसाची कथा
हॅम ऑन राय - लहानपणी छळ झालेल्या आणि त्यातून उदयाला आलेल्या अँग्री यंग मॅनची कथा
हॉलिवूड - हॉलिवूडसाठी लिहिताना आलेल्या सुरस अनुभवांचा लेखाजोखा
पल्प - वाईट कसं लिहावं हे सांगणारं गाइड
या सर्व कथांचा नायक 'चिनास्की' म्हणजे म्हणजे स्वत: बुकोव्हस्कीच आहे, त्यामुळे या कादंबऱ्या तितक्याशा काल्पनिक नाहीत, किंबहुना आत्मचरित्रपर आहेत असंही म्हणायला हरकत नसावी. त्याची भाषा उघडीवाघडी होती, त्याला कोणताही मुलामा दिलेला नव्हता. तो नेमकं लिहायचा, पाल्हाळिक निवेदनाला त्याच्या लिखाणात जागा नाही. कोण काय म्हणेल याबद्दल त्याला पर्वा कधीच नव्हती, त्यामुळे त्याने 'आहे हे असे आहे' या सूत्राला धरूनच लिखाण केलं. इतरांना आवडेल असं नाही, इतरांनी त्याला स्वीकारावं म्हणून नाही, पण त्याला जसं योग्य वाटलं तसं.
थोडं विषयांतर होतंय, पण माल्कम ग्लॅडवेल म्हणतो त्याप्रमाणे कोणतंही कौशल्य हा सरावाचा भाग असतो आणि त्याबद्दल त्याने १०००० तासांचं प्रमेय मांडलं आहे. १०००० तास योग्य पद्धतीने सराव केल्यास कोणतंही कौशल्य आत्मसात करता येतं असा त्याचा दावा आहे. ग्लॅडवेलच्या कित्येक वर्षx आधी बुकोव्हस्कीने त्याचं प्रमेय सप्रमाण सिद्ध केलं होतं.
म्हणूनच 'डोण्ट ट्राय' हा बुकोव्हस्कीचा आवडता फंडा आहे. बुकोव्हस्कीला जिथे पुरलंय तिथल्या हेडस्टोनवरही हेच वाक्य आहे. तुम्ही तुमचं काम करत राहिलात, तर जे तुम्हाला मिळायचं आहे ते तुम्हाला मिळेलच. जे तुमचं नाही ते तुम्ही कितीही डोकेफोड केलीत तरी तुम्हाला मिळणार नाही. ध्येयाधिष्ठित कर्मवादाचं याहून चांगलं उदाहरण मिळणं शक्य नाही.
बुकोव्हस्की कायम तिऱ्हाइतासारखा जगला. त्याला कोणी आपल्या गटात सामील करून घेतलं नाही...त्याच्या मुरुमांच्या व्रणांनी भरलेल्या चेहऱ्यामुळे असेल म्हणून, किंवा चारचौघात कसं वागावं-बोलावं याबद्दलच्या सर्व प्रमाण कल्पनांना तो हेतुपुरस्सर फाट्यावर मारत असेल म्हणून, किंवा त्याच्या एकंदरच निवडुंगासारख्या व्यक्तिमत्त्वामुळे असेल. आणि त्यानेही कधी स्वत:हून या कळपांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला नाही. कंपूंचा, घोळक्यांचा, कळपांचा त्याने नेहमी तिरस्कारच केला.
घरी बापाने आणि शाळेत इतर मुलांनी केलेला छळ, आपण कोणालाच आवडत नाही याची पदोपदी जाणीव करून दिलेल्या मुलाने करावं तरी काय? स्वत:च्या दुखऱ्या अस्तित्वावर त्याने दारूचा उपाय शोधला, जो त्याला जन्मभर पुरला; पण सुदैवाने त्याला पुस्तकांचीही साथ मिळाली. त्या शापावरचा तो उपशम, उतारा होता. तो म्हणतो, पुस्तकं नसती, तर त्याने एकतर खून तरी पाडले असते, किंवा आत्महत्या तरी केली असती. एफबीआयचा त्याच्यावर कायम दात होता. आईकडून जर्मन वंशाचा असल्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एफबीआयची संशयाची सुई त्याच्यावर कायम राहिली होती आणि तो 'हिरवट म्हाताऱ्याची पत्रे' या नावाने वर्तमानपत्रातला एक प्रक्षोभक स्तंभ चालवत असल्याचे कारणही त्यांना बराच काळ पुरलं.
फ्रान्झ काफ्काप्रमाणे बुकोव्हस्कीनेही प्रस्थापितांचा तिरस्कार केला. बुकोव्हस्कीचा मुळं रोवण्यावर, जम बसवण्यावर, एका ठिकाणी टिकून राहण्यावर विश्वासच नव्हता वाटतं, कारण तो आयुष्यभर एखाद्या फुलपाखरासारखा एका नोकरीवरून दुसऱ्या नोकरीवर भिरभिरत राहिला, पदराशी एक कवडीही न बाळगता.. तो नेहमी म्हणायचा, "कोण म्हणतं गुलामगिरी संपली? ती फक्त वेगळ्या रंगात, वेगळ्या ब्रँडमध्ये सुरू झाली." लिखाण मात्र त्याने कधीच सोडलं नाही, कायम सुरू ठेवलं, त्याच्या लिखाणाला प्रस्थापित साहित्य संस्थांची कायम नकारघंटा मिळूनही. त्याच्यासाठी लिहिणं म्हणजेच जगणं होतं. कोणी टिकोजीरावाने 'नाही' म्हणून निकाली काढलं तरी ते थांबणार थोडीच? तो म्हणायचा, "तुम्हाला लिहिण्याचा कैफ आहे म्हणून लिहा, प्रसिद्ध होण्यासाठी लिहू नका. लिखाणासाठी पैसे मिळणे आणि एखाद्या सुंदर बाईसोबत झोपल्यानंतर सकाळी तिने आपल्या उशाशी पैसे ठेवून जाणे - यात काहीएक फरक नाही. तुम्ही जे आहात तसं लिखाणात उतरू द्या. लोकांना तुम्ही कसे आहात असं वाटावं असं तुम्हाला वाटतं - तशा पद्धतीने लिहू नका. लिहिताना तुम्हाला बोअर झालं, तर वाचणाऱ्यालाही ते बोअरच होणार आहे."
त्याला त्याच्या नाजूक जागा नेमक्या माहीत होत्या. दारू, बाया आणि एकूणच मनुष्यजातीबद्दल वाटत असलेला अविश्वास. स्त्रियांसोबतचं त्याचं नातं म्हणजे तुझं-माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमे ना. त्याचं स्त्रियांबद्दलचं एक निरीक्षण मोठं रोचक आहे. तो म्हणतो, "मला बाई आवडते. तिच्या कपड्यातली रंगसंगती, तिचा डौल, तिच्या चेहऱ्यावरचं 'मी तुला चुटकीसरशी चिरडून टाकेन' छापाचं मूर्तिमंत क्रौर्य, हे मला तुफान आवडतं. आपण बीयर पित फुकाचे फोकलत फूटबॉल पाहात असतो, तेव्हा ती तिच्या ह्रदयाच्या सिंहासनावर तुमची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विचार तरी करत असते, किंवा तुम्हाला मारून कुठे गाडायचं याचे बेत आखत असते. मला बाई आवडते; पण, बाईला मी आवडलो की तिला मी माझ्या आत्म्यासकट हवा असतो. आता तो मी तिला कसा देऊ? जितका उरला आहे, तो मला माझ्यापुरता ठेवायचा आहे."
ज्या पुरुषाला बाईची गरज नाही, तो पुरुष अविनाशी, अभेद्य आहे - हा त्याचा लाडका फंडा होता. त्याच्या मते गे माणसं जास्त क्रीएटिव्ह असतात, कारण विषमलिंगी बाया-पुरुषांमध्ये चालणाऱ्या पॉलिटिक्समध्ये जसा त्यांचा वेळ वाया जातो, तसा या गे लोकांचा जात नाही.
अनुभवाने माणूस कितीही कडवट बनत गेला, तरी त्याच्या आत-आत एक दुखरी-हळवी बाजू असतेच, बुकोव्हस्कीचीही होती. 'मेन आर वायर्ड दॅट वे' असं म्हणणारा हैराण जाळपोळ करत हिंडणारा सेल्फ-डीस्ट्रक्टिव्ह माचो नाही तो. तो ते हळवेपण कोणत्याही इतर गोष्टीसारखं निखालस कबूल करतो, इतकंच नाही, तर ते जाहीररीत्या सांगतोही.
त्याची ब्लूबर्ड (नीलपक्षी) नावाची कविता आहे
माझ्या काळजात एक नीलपक्षी आहे
ज्याने निकराने बाहेर यायचा चंग बांधलाय
पण मीही काही कमी नाही
मी म्हणतो, "गुमान आत रहा. तुला कोणी पाहिलेलं खपणार नाही मला."
माझ्या काळजात एक नीलपक्षी आहे
ज्याने निकराने बाहेर यायचा चंगच बांधलाय
पण मी त्याच्यावर व्हिस्कीचा ग्लास ओततो, घुसमटवून टाकतो त्याला सिगरेटच्या धुरात
मी ज्यांच्यासोबत झोपतो त्या बाया, बारमध्ये दारू ओतणारे बाप्ये
मी ज्या दुकानातून सामान भरतो तो वाणी
कोण्णाकोणालाही माहीत नाहीये, की तो तिथे आहे
माझ्या काळजात एक नीलपक्षी आहे
ज्याने निकराने बाहेर यायचा चंगच बांधलाय
पण मीही काही कमी नाही
मी म्हणतो, "गुमान आताच रहा. माझी वाट लावायची आहे का तुला?
माझं आतापर्यंतचं सगळं काम विस्कटून जाईल
आणि युरोपमधल्या पुस्तकांच्या खपाचं काय होईल?"
माझ्या काळजात एक नीलपक्षी आहे
ज्याने निकराने बाहेर यायचा चंगच बांधलाय
पण मी त्याच्याहून जास्त शहाणा आहे. मी त्याला फक्त रात्री बाहेर येऊ देतो
सगळे झोपलेले असताना
मी म्हणतो, तू आहेस तिथे हे माहीत आहे मला
त्यामुळे अनुल्लेखाचं दु:ख करत बसू नकोस
मग मी त्याला जिथे होता तिथे परत सोडतो
पण तो तिथे आत हलकेच गुणगुणतो आहे,
मी त्याला मरू नाही दिलेलं अद्याप
..
आणि मी व तो असेच झोपतो
एकमेकांमध्ये अलिखित करार असल्यासारखं
.
.
हे असं निळं पाखरू कोणत्याही चांगल्या माणसाला अश्रू ढाळायला लावेल
पण मी अश्रू ढाळत नाही
तुम्ही ढाळता?
--
वरची ती हळवी कविता लिहिणारा हाच तो बुकोव्हस्की.
जी माणसं स्वत:बद्दल स्पष्टीकरणं द्यायला जात नाहीत, त्यांच्याबद्दल लोक गृहितकं बनवून घेतात. ही गृहितकं चुकीची आहेत की बरोबर याची शहानिशा करण्याच्या भानगडीत सहसा कोणी पडत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीबद्दलची इतरांची व्हर्जन्स काही काळाने खरीच वाटायला लागतात. त्या गृहितकांच्या वदंता बनतात, वदंतांच्या अफवा बनतात आणि मग त्या अफवांमधून मूर्त होणारी व्यक्ती व मूळ व्यक्ती यांमध्ये बिलकुल साधर्म्य राहात नाही. बुकोव्हस्कीबद्दल काय बोललं जायचं याची त्याला पर्वा नव्हती, कारण आपण काय आहोत याचा जाहीरनामा, लेखाजोखा त्याने त्याच्या लिखाणातून दिला होता. तो बाईबाज होता हे त्याने जाहीरपणे सांगीतलेलं आहे, किंबहुना त्यावर त्याने 'विमेन' नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे.
म्हणूनच,
'ग' ची बाधा झाली की त्यांना बुकोव्हस्कीची मात्रा उगाळून द्यावी, मूढ विचारांचे जंत झाले की त्यांना कडू किरायती बुकोव्हस्की पाजावा.
नेणतेपणी शहाणपण देणारा असा हा बुकोव्हस्की.

No comments:
Post a Comment