मी नुकताच बडोदा - द्वारका - अहमदाबाद ही शहरं फिरून आले. मला फक्त द्वारकेला जाण्यात रस होता आणि आपण एखाद्या ठिकाणी जातोच आहोत, तर हे पण पाहून घेऊ, अशा विचाराने जी शहरं 'केली' जातात, तशी ही शहरं. कोणत्याही प्रवासामध्ये आपण अशी स्टेपनी शहरं 'ठेवून' असतो. जसं 'महेश्वर' करताना मी 'मांडू' ठेवून होते, 'कन्याकुमारी' करताना 'तिरुवन्नामलाई' ठेवून होते. अगदी खरं सांगायचं, तर मुंबई सेंट्रल - द्वारका या अंतरानेच जीव दडपला. मग 'किश्तों'में मजल-दरमजल करत जाऊ, म्हणून बडोदा आणि अहमदाबाद - बाकी कारण असं काही नाही. असं असल्याने "हीच शहरं का?" या प्रश्नालाही अर्थ नाही. बाकी 'किश्तों'वरून आठवलं, "तारा रम् पम्" नावाचा चित्रपट आठवतो का कोणाला? या चित्रपटाने मला कोणतीही गोष्ट ईएमआयवर घ्यायची आयुष्यभराची धास्ती बसली. मी अजूनही एकही गोष्ट ईएमआयवर घेतलेली नाहीये याचं एकमेव कारण म्हणजे हा सिनेमा आहे.
मला ट्रेनने प्रवास करायला आवडतं. तिकिटं खूप आधी बुक करायला लागतात हा एक त्रासदायक आणि डोकेदुखीवाला मुद्दा सोडला, तर मी ट्रेनने प्रवास करायला कायम तयार असते. माझं प्राधान्यच मुळी ट्रेनने प्रवास करण्याला असतं. मी कोणत्याही ट्रेनने दुसऱ्यांदा प्रवास केलेला नाहीये. प्रत्येक वेळी नव्या ट्रेनने गेले. मी भारतभर एकटीने प्रवास केला, अगदी उत्तर भारतातही आणि त्यातला ८०% प्रवास मी ट्रेनने केलेला आहे. दक्षिण भारतात प्रवास करताना घडलेला एकच दुर्दैवी प्रकार वगळला, तर मला ट्रेनचा प्रवास हा खूप सुरक्षित प्रवास वाटतो, भारतात एकट्याने प्रवास करणाऱ्या बाईसाठीही.
तर, मी बडोद्याहून 'सौराष्ट्र मेल'ने द्वारकेला पोहोचले तेच मुळी रामराया जन्मला अशा टळटळीत दुपारी. ट्रेनमध्ये भेटलेल्या 'जगरात्यासाठी' चाललेल्या दोन गुजराती आज्ज्या आणि एका पंजाबी 'बिजी'च्या माहितीचं संचित घेऊन द्वारकेला पोहोचत होते, तेव्हा आपल्याला काय 'नाही करायचंय' याची यादी पक्की झाली होती. द्वारका स्टेशनला पोहोचण्याच्या आधी एक किमीपासूनच दूरवर (चार किमी अंतरावरील) द्वारकाधीश मंदिराचा तो महाकाय ध्वज दिसायला लागल्याने द्वारकाभेटीचं सूतोवाच हे काय उत्तम पद्धतीनं झालं असं मनातल्या मनात म्हणेपर्यंत 'चलो-चलो-चलो' करत मागच्या अतिउत्साही गर्दीने मला द्वारकेच्या प्लॅटफॉर्मवर उतरवलंही.
कोणत्याही शहरात पाय टाकण्याआधी मला त्याचा कानोसा घ्यायची सवय आहे. पहिल्या डेटला आपण समोरच्या मुलाचा अंदाज घेतो, तशी. शहराची हवा त्वचेला कशी लागते आहे हे पाहावं, तिथली गर्दी पाहावी, गर्दी काय करतेय, काय बोलतेय ते पाहावं. प्रत्येक शहराला एक आवाजही असतो. नीट कान देऊन ऐकलं की ऐकायला येतो. पुण्याला तव्यावर शेकलेल्या फुलक्याचा करकरीत आवाज आहे, निर्वात पोकळीमध्ये "राधे राधे" म्हटल्यावर आवाज शोषला जाऊन कसा "स्स्स्स!" आवाज होईल, तसा आवाज मथुरेला आहे, आणि द्वारकेला - कर्ण्याचा आवाज आहे. हा कर्ण्याचा आवाज रेल्वे स्टेशनपासून सुरू झाला, तो मी तिथून निघेस्तोवर जिथे जावं तिथे साथीला होताच. शेवटी शेवटी तर तो कानात दडा मारल्यासारखा रुतून बसला होता, निघेच ना कानातून. द्वारकेत कुठेही जा, जो तो लाउडस्पीकर लावून कर्ण्याचं बोंडूक तोंडापाशी धरून जीवाच्या आकांताने बोंबलतोय आपला. चालायचंच! ओखाचं बंदर, मासेमारी आणि टाटाचा मिठापूरचा कारखाना सोडला, तर चरितार्थासाठी बहुतेक सर्व द्वारकाकर पर्यटनावर आणि पर्यायाने, पर्यटकांवरच विसंबून आहेत. उपजीविकेसाठी या लोकांना प्रचंड मेहनत करायला लागते. स्पर्धा तर तोबा निकराची आहे. साधं पोहे-जिलबीचं दुकान म्हटलं, तरी एकाच रस्त्यावर १०० पोहे-जिलबीवाले. त्यांना त्यांचा माल खपवायचा आहे, त्यांनी नाही खपवला तर त्यांच्या बाजूचा खपवणार आहे. पोटात जळण हवं, तर घसा खरवडायलाच लागतो. इतकी गूढगंभीर गाज देणारा पश्चिम महासागर बाजूला असूनही हा मानवनिर्मित आवाज कधीकधी त्याच्या वरताण ठरतो. गोमती घाट मागे टाकून तुम्ही उजव्या बाजूने द्वारकेच्या दीपस्तंभाच्या दिशेने चालायला लागलात, आणि द्वारकाधीश मंदिर खूप मागे राहिलं, तरी समुद्री वाऱ्यावर आरूढ होऊन तो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोच पोहोचतो, त्यापासून सुटका नाही. एखाद्या गोष्टीपासून सुटका करून घ्यायची असेल, तर त्यावर एकच उपाय - तिला आपलंसं करून घेणं. पण, दुर्दैवाने तितके दिवस माझ्याकडे नव्हते.
![]() |
| गोमती नदी पश्चिम महासागराला येऊन मिळते ती जागा गोमती घाट, द्वारका |
द्वारका म्हणजे मथुरा आणि वृंदावनचा संगम आहे. वृंदावनचा रखरखाट आणि मथुरेचं आदिमपण हे कालवलेल्या वरणभातासारखं द्वारकेत साचलं आहे. आहे गुजरातमध्ये, पण इथे राजस्थानी लोकांचा भरणा फार. पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्याने की काय, कोणास ठाऊक - पण हे लोक प्रचंड पारोसे दिसतात. घरात दुर्लक्षलेल्या सावत्र मुलाच्या चेहऱ्यावर जी कळा असते, ती या पूर्ण शहरावर आहे. द्वारकेतली बाई असो वा पुरुष, दोघांच्याही तोंडाला विश्रांती म्हणून नाही. बायांच्या तोंडाची टकळी अखंड, अहोरात्र सुरू असते. त्या इतकं कशाबद्दल बोलतात? यात आपण पडायचं नाही. गाडीचे रूळ फटाक्-फटाक् बदलावेत, तसे त्यांच्या बोलण्याचे विषयही मिनिटा-मिनिटाला बदलतात. आवाजही तार सप्तकातला, विधात्याने गळ्यात मायक्रोफोन बसवून घडवलेलं असावं, तसा. तुम्ही रांगेत उभे असाल, आणि तुमच्यापुढे एखादी बाई आणि तिची जेठानी उभी असेल, तर डोकेदुखीची निश्चिंतीच समजा. ओखा एक्स्प्रेसने द्वारकेहून अहमदाबादला येताना तर मी या बायांच्या अखंड बडबडीला, त्यांच्या फिदीफिदी मोठ्यांदा हसण्याला इतकी कंटाळले, की मी सीटच बदलली. माझ्या सुदैवाने गाडी रिकामी होती आणि त्यांच्यापासून खूपच लांब एक बरी सीट मिळाली. बायांचं हे असं, तर पुरुष कायम तांबूलभक्षणात मग्न किंवा जर्दा-खैनी-पानमसाला चावत बसलेले. मी गोमती घाटासह द्वारकाधीश मंदिराच्या चार किमी परीघातला परिसर पायी फिरले आहे आणि मी हे खात्रीने सांगू शकते पान-पानमसाला खाऊन पिंक मारलेली नाही किंवा पाण्याची चूळ भरून टाकलेली नाही असा १ मीटरही मोकळा रस्ता मला दिसलेला नाहीये. ही रंगश्रीमंत आणि कुवासिक रंगरंगोटी चुकवून चालताना पाय लचकला नाही, तरच नवल. मग हॉटेलमध्ये येऊन गरम पाण्यात पाय बुडवून बसायचं - हा नेम तीनही दिवसांमध्ये एक दिवसही चुकला नाही.
![]() |
| मिशाळ मुरुकाका चहावाला |
या झाल्या न आवडलेल्या गोष्टी. आणि आणखी एक म्हणजे, द्वारकेत ऊन फार. पण, त्या रणरणत्या उन्हात रसरसून फुललेली लाल-पिवळी-गुलाबी-केशरी बोगनवेल द्वारकेच्या कोपऱ्याकोपऱ्यात दिसते. हे गुजराथी, राजस्थानी लोकं त्या बोगनवेलीचे भरपूर लाड करतात. आईने छान तेलफणी करून घट्ट, नीटस वेणी घालून द्यावी तशी तीन-चार वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगांच्या बोगनवेलींंची खोडं पीळे मारून एकत्र करतात हे लोक. खाली ही व्यवस्था लागली की वर बोगनवेलीचा जो बहुरंगी फुलोरा डंवरतो, तो पाहून त्या रखरखाटातही डोळे निवतात, मन शांतवतं. बेट द्वारकेत तर मी असं घर पाहिलं जिथे पिंपळावर पार शेंड्यापर्यंत बोगनवेल चढवली होती. झाड पिंपळाचं आहे की बोगनवेलीचं, हे कळू नये - इतकी ती दोन्ही झाडं एकमेकांमध्ये एकरूप होऊन गेली होती. राधे-क्रिष्ण, राधे-क्रिष्ण, राधे-राधे-क्रिष्ण-क्रिष्ण या जपनामासारखी. आधी कोण, नंतर कोण - हे कळूच नये. फक्त द्वारकेतच नाही, तर बडोद्यात, इतकंच काय तर अहमदाबादेतही ही तिपेडी, चौपेडी (बडोद्यात सयाजी बागेत पाचपेडी पण पाहिली आहे) बोगनवेल प्रत्येक हमरस्त्यावर दिसते.
याशिवाय मनात रुतून बसलेल्या, उपसून न काढता येणाऱ्या कित्येक गोष्टी आहेत. द्वारकेच्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून फिरताना आपण इथले नाही हे जाणवून कोणीतरी कुतूहलाने टाकलेली "जय श्री क्रिष्ण बेहन" ची आरोळी आणि त्याला आपल्याकडूनही तितक्याच उत्स्फूर्तपणे गेलेलं "जय श्री क्रिष्ण दादा"; हातभर दाढी वाढलेल्या वेड्या बाबाने अचानक समोर येऊन "क्यो पार्वती! इतनी देर क्यूं लगाई" असं विचारणं आणि त्यानंतर वाटलेलं कुतूहलमिश्रित ओशाळेपण; बेट द्वारकेत तीन-चार सेकंदांसाठी तुम्ही आणि समोरचा कृष्ण हे सोडून बाकी सभोवतालचं सगळं निमून कृष्णाशी करता आलेलं हितगूज, त्यानंतर सभोवताचा गोंधळ द्विगुणित होऊन कानावर आदळून भंग पावलेली समाधी आणि वास्तवाचं भान येणं; समस्त द्वारकाजनाचं तांबूलभक्षण करून दिवसभर, आयुष्यभर कसल्या ना कसल्या तरी तारेत राहणं; राजस्थानातून द्वारकेत येऊन, अर्धपोटी राहून रिक्षा चालवून संसार करण्याची स्वप्नं पाहणारे तरूण; जगण्याचा शोष विसरून दिवसातून सहा वेळा बदलणाऱ्या ध्वजारोहणाला तितक्याच, नव्हे कणभर जास्तच उत्साहाने जयजयकार करणारी गर्दी; वर्षानुवर्षं, न चुकता, रोज पहाटे रांग लावून 'क्रिष्ण महाराजांचं' दर्शन घेणारे द्वारकाकर; द्वारकाधीश मंदिरात १ किमीपर्यंत ऐकू जाईल अशी रात्रीची आरती सुरू असताना गायत्री टेंपल रोडवरच्या अवघ्या 8x8 च्या खोलीत माना खाली घालून अभ्यास करणारी, कदाचित या शहरातून बाहेर पडायची स्वप्नं पाहणारी पोरं; देवळात 'रेग्युलर्स' सोडून बाकी कोणालाही न मिळणारा, पण मुरुकाकाने सर्वांना प्रेमाने वाटलेला तुलसी-लोण्याचा प्रसाद; कृष्णच आपला तारणहार आहे या गाढ विश्वासाने पिढ्यानुपिढ्या, दशकानुदशकं चाललेल्या भक्तीचं आवर्तन, पण पर्यटकांना लुबाडणारे हेच बनेल लोक - यांनी मला विचारात टाकलं. काय खरं - काय खोटं? काय चूक - काय बरोबर? तुम्हाला विचार करायला लावणारी गोष्ट तुम्हाला नावडू शकतच नाही. त्यामुळेच, नावडलेल्या किती साऱ्या गोष्टी असूनही द्वारका मला आवडली नाही, हे तरी मी कसं म्हणावं?
आपण आपल्याला आलेल्या कडूगोड अनुभवांमुळे काही दारं कायमची बंद करून घेतो आणि त्या बंद दारांची चावी कुठेतरी फेकून देतो. आपले समज आणखी कट्टर, बऱ्या-वाईटाच्या संकल्पना आणखी ताठर होत जातात. माझ्या गाठीशी मथुरा-वृंदावनचा आणि बांकेबिहारीचा अनुभव आहे, त्यामुळे आता मला या लोकांचा राग येत नाही. आहे हे असं आहे, त्यावर तुम्ही कितीही डोकेफोड केलीत तरी ते बदलणार नाही, हे कटू सत्य मी हलाहलासारखं पचवलं आहे एकदाचं. आता मला त्यांच्याबद्दल कुतूहल, आणि वाटलीच तर करुणा जास्त वाटते. त्यामुळेच, द्वारकेत असताना मला ही घट्ट ओढून घेतलेली दारं थोडी किलकिली करता आली, माझ्या डोळ्यांवरचा आधुनिकतेचा, बुद्धिनिष्ठतेचा चष्मा थोडा वेळ काढून ठेवता आला आणि आदिम प्रेरणा घेऊन रोजचं आयुष्य जगणारे हे सेपियन्स थोडेफार का होईना, कळून घेता आले.
मैथिलीशरण गुप्त यांची एक कविता आहे
तेरे घर के द्वार बहुत हैं,
किसमें हो कर आऊं मैं?
सब द्वारों पर भीड़ मची है,
कैसे भीतर आऊं मैं?
नव्या अनुभवांना जागा मोकळी करून द्यायची असेल, तर जुन्या अनुभवांना थोडं बाजूला सारावं. अगदीच तिलांजली द्यावी असं नाही, पण नव्या शक्यतांना वाव असावा. आणि पुढच्या वेळी, मनाची दारं सताड उघडी करावीत, स्वच्छतेचं इंद्रिय आवरावं, आवश्यक असेल तेव्हा बहिरेपण आणण्याची कला आत्मसात करावी, आपले पूर्वग्रह, पूर्वसमज मुंबईच्या घरी बासनात गुंडाळून ठेवावेत आणि पुन्हा द्वारकेला यावं.
प्लॅन तर तोच आहे. पाहू या, कसं होतंय ते.
तोवर, श्रीकृष्णार्पणमस्तु!



No comments:
Post a Comment