कोई ना, कोही चाहिये

 कॉफीला जपानी भाषेत 'कोsहीs' (コーヒー) म्हणतात. 

आपल्या कोकिळेच्या 'कुsहूs'च्या आसपास जाणारा शब्द. म्हणजे, कॉफी पिऊन झाल्यानंतर आपण तृप्त होऊन 'कोsहीs' अशी साद घालावी अशी शब्दयोजना, 'व्वा, उस्ताद, व्वा' सारखी.

सर्वसाधारणपणे, नवीन भाषा शिकायला सुरुवात केल्यानंतर लोकं 'आय लव्ह यू', 'हाय, माझं नाव अमकंठमकं आहे', 'लायब्ररी कुठे आहे?' हे बोलायला शिकतात. मी मात्र कॉफीला काय म्हणतात, 'दरवळ', 'अर्क', 'कडक', 'मातकट', 'गोड', 'कडूजार' या शब्दांची त्या भाषेतली भावंडं शोधत बसते. 

कॉफी आणि माझं प्रेम अलीकडचंच, बंगळुरुमध्ये घालवलेल्या ८ वर्षांमधलं. चांगली कॉफी शॉप्स, कॅफे, टपऱ्या हेरून कॉफी प्यायची झाली तर किमान अर्धा दिवस ओलीस ठेवून, ट्रेन पकडून अप-डाउन करायच्या हजामत्या करायला लागणार नव्हत्या, अशा काळातलं. शनिवारी सकाळी सुझुकीवर टांग टाकून इंदिरा नगरला जावं, आणि छान आंघोळ करून, केसांचा नीटस भांग पाडून, कपाळी गंध लावून पांढरा पंचा ल्यायलेल्या करड्या रंगाच्या अण्णाने उदबत्त्यांचा वास चिकटलेल्या, लखलखत्या पितळेच्या वाटीतून सकाळी-सकाळी ती दाट, फेसाळ फिल्टर कॉफी प्यायला द्यावी आणि आपणही ती फूंssफूंss करत, फुंकरा मारत ओठाला भाजतच प्यावी. इथून कॉफीप्रेम जे सुरू झालं, ते अपग्रेड होतच गेलं. नंतर तर ते इतकं घट्टमुट्ट झालं, की ते 'कॉफी नकोच, तब्येतीला वाईट', 'कॉफी पित्तकारी आहे', 'कॉफी हे फारीनर लोकांचं फ्यॅड आहे, चहाच काय तो आपला' असं म्हणून कॉफीला दूर केलं त्या ब्रेकअपच्या काळालाही पुरून उरलं.

पहिली ही इंदिरा नगरमधली फिल्टर कॉफी, मग जयनगरच्या 'क्वीन्स कॉफी'मधली अराबिका कॉफी. 

मार्चमधली दुपारची  वेळ. उन्हाला तो भगभगीत केरोसीनसारखा वास अद्याप यायचा होता. काहीतरी काम आटपून मेट्रो स्टेशनाकडे यायला निघाले होते. काय काम होतं ते जाम आठवत नाही, पण जयनगरच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी सोनमोहोर नुस्ता उतल्यामातल्यासारखा फुलला होता हे मात्र लख्ख आठवतं. सोनमोहोराची नाजूक, तलम पाकळ्यांची फुलं भिरभिरत खाली पडत होती. अशा रस्त्यावरून जवळजवळ ट्रान्समध्ये चालत असताना माझ्या नाकपुड्यांमध्ये तो कॉफीचा वास शिरला. 

'क्वीन्स कॉफी'. 

बॉटल ग्रीन रंगाच्या भिंती असणारं आणि काचेच्या फडताळांमध्ये केक ठेवणारं, 'आधी कॉफी प्या, मग पैसे द्या' असं सांगणारं दुकान. त्या दुकानाच्या दारातही सोनमोहोर चवऱ्या ढाळत होता. सोनमोहोराच्या झाडाच्या भोवती दगडी पार बांधला होता आणि त्या पारावर बसून लोकं पेपर वाचत कॉफी पीत होती. त्यापैकी काही लोकांचा दुसरा-तिसरा कप सुरू होता (त्यांच्या बाजूला रिकाम्या कपांचा मनोरा रचून ठेवला होता त्यावरून ). इतक्या छान, चित्रवत वाटणाऱ्या दुकानातली कॉफी वाईट असूच शकत नाही असंच काहीसं माझ्या मनाने घेतलं, आणि ते खरंही निघालं. इतकी सुंदर, शरीरातल्या अणूरेणूला जागृत करणारी १००% अराबिका कॉफी (चिकोरीचा एक कणही नाही) मला त्यानंतर आजतागायत मिळालेली नाही. तेव्हापासून मी जयनगर मेट्रो स्टेशनला उतरले, की माझ्या नाकात क्वीन्स कॉफीचा दरवळ सुरू होतो. अंधेरी स्टेशन सोडलं की पार्ल्याची बिस्कीट फॅक्टरी लागते आणि भररात्री फॅक्टरी बंद असली तरीही पार्ले-जीचा वास कसा आपोआप नाकात पसरायला लागतो, प्रोग्राम केल्यासारखा? अगदी तसंच. 

बंगळुुरुमध्ये मी नागवरापल्यामध्ये राहायला होते आणि दर शुक्रवारी आउट झालेलं डोकं घेऊन मी बेन्निगानाहळ्ळीच्या मॅकडॉनल्ड्समध्ये कॉफी प्यायला जायचे. त्यांची कॅप्युचिनो आणि लक्ष-लक्ष कॅलरी असलेलं चॉकलेट मफिन - हा माझा दर शुक्रवारचा शिरस्ता. पण, तिथेही गंमत अशी की, तिथे 'किरण' (बाई, पुरुष नाही) नावाच्या बरिस्ताची शिफ्ट असायची, तेव्हा ती कॉफी खास जमलेली वाटायची. खरंतर, कॉफी करण्याचं तंत्र सारखं असेल, तर कॉफीची चवही सारखीच असायला हवी, बरिस्ता कोणीही का असेना तिथे; पण, तसं होत नाही. कोव्हिडनंतरची कितीतरी वर्षं, त्या वर्षातले कितीतरी शुक्रवार मी किरणच्या हातची कॅप्युचिनो आणि हेझलनट मोका पिऊन काढले, ते ती तिथून निघेपर्यंत. ती गेल्यानंतर तिथली कॉफी बरी लागलीच नाही. मग मॅकडॉनल्ड्समध्ये कॉफी प्यायला जाणं थांबलं ते थांबलंच.

२०२२ पासून बंगळुरुमध्ये कोपऱ्याकोपऱ्यावर मशरूमसारखी कॉफी शॉप्स उघडायला लागली. ब्लू टोकाई नुकताच जम बसवत होतं त्या काळात त्यांच्या त्या कॉर्न ब्लू रंगाच्या कपातून प्यायलेली 'चिली सिनॅमन मोका' माझ्या जिभेला, नाकाला अजून आठवते. फक्त एमजी रोडच्या मलाबार गोल्डमध्ये मिळणारी, बाकी कोणत्याही मलाबार गोल्डमध्ये न मिळणारी मिळणारी मशीनवाली अगोड कॉफी प्यायला मी दर सणावारी जायचे. सोनं घेतलं, नाही घेतलं, तरी त्यांची एकनिष्ठ ग्राहक म्हणून माझ्या हातात कॉफीचा एक कप यायचाच. मी पण ताकाला जाऊन भांडं लपवल्यासारखी ती कॉफी पिऊन खुशीत घरी यायचे. कधीकधी बदल म्हणून बंगळुरुमधल्या महाराष्ट्रीय रेस्टॉरंटमध्ये मिळणारी आपली मराठी दुधाळ (साखरेचं प्रमाण स्टॉकमार्केटसारखं कमी-जास्त होणारी) नेस्सsकॉफी प्यायचे. त्यानंतर 'स्क्विड गेम्स' नंतर आलेल्या फ्यॅडातून ब्रिगेड रोडला कडू-मेणचट, पण वेगळंच इट्ट असलेली 'दालगोना कॉफी' प्यायले होते. मी कॉफीकडे ढुंकूनही पाहायचे नाही अशा काळात, म्हणजे पंधराएक वर्षांपूर्वी मला माझ्या एका मैत्रिणीने थोडंसं दूध घालून कॉफी कशी घोटावी हे दाखवलं होतं. दालगोना कॉफी हा त्याचाच अतिरेकी प्रकार आहे हे आता कळून थोडं हुरहुरल्यासारखं झालं होतं. अशा अनेक प्रकारच्या, रंगाच्या, वासाच्या, प्रतीच्या कॉफीने माझ्या नाकाच्या आतल्या पडद्यांवर, जिभेवर आणि टाळूवर शिक्के उमटवून ठेवलेले आहेत, कधीही न पुसले जाणारे. 

उद्या सकाळी उठून पांढऱ्याशुभ्र, लठ्ठ मगमधून कॉफी प्यायची आहे, हा विचार मला प्रेरक वाटतो. अचूक तापमानाला तर आपली 'ब्रू' किंवा 'सनराइझ' सुद्धा सुंदर लागते. कॅम्लिनची काळी शाई पातळी केली की होणाऱ्या काळ्या रंगाची ती ब्रू कॉफी, तिच्यामध्ये लिंबू पिळावं, आणि ती थोडी कोमट झाल्यावर त्यात मधाचा एक मोठ्ठा चमचा भरून एकजीव करावा. ही कॉफी जिभेवर, अन्ननलिकेतून गंमतजंमत करत जाते आणि पोटात स्थिरावून साक्षीभावाची आतषबाजी करते. भरीस भर म्हणजे, हा द्रव कोमट असतानाही बरा लागतो. कधीकधी ऐश करायची असेल, तर यात लिंबाऐवजी थोडं जायफळ पेरावं आणि 'हाय' व्हावं. कोणी काय 'ठेवून' असावं याला कोणाचा प्रत्यवाय थोडीच आहे?

बडबड करायला चहा लागतो, पण चिंतनाचा मूड असेल, विचार करायचा असेल तर (मला) कॉफीच हवी. भरदिवसा दारू पिऊ नये, तसं भररात्री किंवा झोपण्याच्या किमान ८ तास आधी कॉफी पिऊ नये असं म्हणतात, म्हणून आज आता हे लिहिताना हाताशी कॉफी नाही. आता नाही, पण उद्या सकाळी नक्की असणार आहे हा विचार सुखद आहे. 

कोई नही, बस्स कोही चाहिये.

No comments:

 
Designed by Lena